लाहोर : पाकिस्तानचा क्रिकेटपटू इमाम उल हकवर अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. आरोप करणाऱ्या या मुलींनी इमाम उल हकसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. हे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर इमाम उल हक गोत्यात आला आहे. इमाम उल हक हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हकचा भाचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमामुल हकने गेल्या सहा महिन्यांमध्ये एकाच वेळी ७-८ मुलींना डेट करुन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. इमामुल हक याच्या चॅटचे स्क्रिनशॉट व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीजवळ अनेक व्हिडिओ आणि मुलींसोबतचे फोटोदेखील आहेत. पण त्या संबंधित मुलींची बदनामी होऊ नये तसेच, त्या मुलींच्या परवानगीनंतरच हे फोटो शेअर करणार असल्याचे ती अज्ञात व्यक्ती म्हणाली.



या सर्व प्रकरणाची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे. पण क्रिकेट बोर्ड या सर्व प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. इमामुल हकचा हा वैयक्तिक वाद असल्याने पीसीबी हस्तक्षेप करणार नसल्याची माहिती पीसीबीचे मीडिया संचालक समी उल हसनने दिली.


दरम्यान अशा वादात फसणारा इमामुल हक हा एकटाच पाकिस्तानी खेळाडू नाही. याआधी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने एका टीव्ही शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. लग्नानंतर पाच ते सहा महिलांशी अफेयर असल्याचा खुलासा रजाकने केला होता.  यातलं एक अफेयर दीड वर्ष चाललं असल्याचं रझाकने सांगितलं.


भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावरही महिलेशी संबंध ठेवल्याचा आरोप त्याचीच पत्नी हसीन जहांने केला होता. हसीन जहांनेही मोहम्मद शमीच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. 


इमाम उल हकने आतापर्यंत १० टेस्ट मॅचच्या १९ इनिंगमध्ये ४८३ रन केले आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्टमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर ७६ रन आहे. तर ३६ वनडेमध्ये त्याने १६९२ रन केले आहेत. यामध्ये ७ शतकं आणि ६ अर्धशतकं आहेत. १५१ रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.