भारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनात घसघशीत वाढ
भारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनामध्ये बीसीसीआयनं घसघशीत वाढ केली आहे.
मुंबई : भारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनामध्ये बीसीसीआयनं घसघशीत वाढ केली आहे. निवड समितीच्या सदस्यांचं मानधन ३० लाखांनी आणि निवड समिती अध्यक्षांचं मानधन २० लाखांनी वाढवण्याला सर्वोच्च न्यायालयानं नेमून दिलेल्या समितीनं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता निवड समितीच्या सदस्यांना ९० लाख रुपये वर्षाचे आणि निवड समिती अध्यक्षांना १ कोटी रुपये वर्षाचे मिळणार आहेत. याआधी हे मानधन ६० लाख आणि ८० लाख रुपये होतं.
सध्या भारताचे माजी विकेट कीपर एमएसके प्रसाद भारतीय निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर देवांग गांधी आणि सरनदीप सिंग हे दोघं सदस्य आहेत. मागच्या वर्षीपर्यंत या समितीमध्ये गगन खोडा आणि जतीन परांजपे हेदेखील होते. पण निवड समिती तीनच सदस्यांची आणि टेस्ट क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची असावी असा नियम लोढा समितीनं केला होता.
याचबरोबर ज्युनिअर टीमच्या निवड समिती सदस्यांचं मानधनही वाढवण्यात आलं आहे. ज्युनिअर टीमच्या निवड समिती सदस्यांना ६० लाख तर अध्यक्षांना वर्षाला ६५ लाख रुपये मिळणार आहेत.
महिलांच्या निवड समिती सदस्यांचं मानधन वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महिलांच्या निवड समिती सदस्याला २५ लाख रुपये वर्षाला आणि अध्यक्षाला ३० लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत.