Ind vs Aus: चौथ्या टेस्टआधी भारताला २ मोठे धक्के, हे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
भारतासाठी हा मोठा धक्का आहे.
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारी सिडनी येथे तिसरा कसोटी सामना खेळला गेला, जो ड्रॉ ठरला. हा सामना ड्रॉ करणं भारतासाठी विजयापेक्षा काही कमी नव्हता, कारण प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताचे अनेक खेळाडू होते जे 100% तंदुरुस्त नव्हते. चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून आता दोन मोठ्या खेळाडूंना बाहेर जावं लागलं आहे. भारतासाठी हा मोठा धक्का आहे.
खरं तर, बीसीसीआयने आपल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, रविंद्र जडेजाला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सोमवारी तिसऱ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. अष्टपैलू रवींद्र जडेजा आता ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांकडून सल्ला घेतल्यानंतर बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी येथे जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जडेजा 19 जानेवारी रोजी गाब्बा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटीसाठी उपलब्ध होणार नाही. अष्टपैलू म्हणून जडेजा संघाला चांगला समतोल प्रदान करतो. हा भारतीय संघाला मोठा धक्का आहे. तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील महत्वपूर्ण खेळाडू म्हणून ओळखला जातो.
जडेजा व्यतिरिक्त दुसरा धक्का हनुमा विहारीच्या रूपात भारतीय संघाचा लागला आहे. कारण त्यालाही दुखापत झाली असून चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध होणार नाही. तिसर्या कसोटी सामन्याच्या बरोबरीत हनुमा विहारीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक आहे, दुखापतीनंतरही त्याने जवळजवळ तीन तास मैदानावर उभे राहून ऑस्ट्रेलियाच्या तुफानी गोलंदाजांचा सामना केला. अशा प्रकारे हा भारतासाठी दुहेरी धक्का आहे.