जसप्रीत बुमराहने गाबा टेस्ट दरम्यान रचला इतिहास, लवकरच कपिल देवचाही रेकॉर्ड मोडणार
IND VS AUS 3rd Test : दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे.
IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना हा भारताने तर दुसरा सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे सध्या सीरिज ही 1-1 अशा बरोबरीत आहे. शनिवार पासून टेस्ट सीरिजचा तिसरा सामना हा ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे.
गाबा टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्यावर बुमराह ऑस्ट्रेलियात 50 विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा बुमराह हा दुसरा गोलंदाज आहे. 31 वर्षीय बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 19 इनिंग्समध्ये 50 विकेट्स घेतल्या, दरम्यान त्याचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट हा 42.82 इतका होता. तर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियामध्ये 51 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत, त्यावेळी त्यांच्या गोलंदाजीचा स्ट्राईक रेट हा 61.50 इतका होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुढील टेस्ट सामन्यात बुमराहने अजून 2 विकेट्स घेतल्या की तो कपिल देव यांचा रेकॉर्ड देखील मोडेल.
दुसऱ्या टेस्टमध्ये मोडला कपिल देव यांचा खास रेकॉर्ड :
जसप्रीत बुमराह हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एका इनिंगमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने या देशांविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळताना तब्बल 8 वेळा पाच विकेट्स घेतल्या. यापूर्वी कपिल देव यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. कपिल यांनी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या चार देशांविरुद्ध खेळताना 7 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा : IND VS AUS : भारतीय गोलंदाजांना चिडवणाऱ्या फॅन्सना कोहलीने एका इशाऱ्यातच गप्प केलं, Video Viral
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये 2024 मध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. याबाबतीत आर अश्विन याने 46 विकेट्स घेतल्या असून तिसऱ्या क्रमांकावर 45 विकेट्स घेणारा शोएब बशीर आहे तर रवींद्र जडेजाच्या नावावर 44 विकेट्स आहेत. बुमराहने 2024 या वर्षात आतापर्यंत 11 टेस्ट सामने खेळले यात त्याने तब्बल 50 विकेट्स घेतल्या. मागील 22 वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने अशी कामगिरी केली नव्हती. यापूर्वी कपिल देव यांनी दोनदा तर जहीरने एकदा अशी कामगिरी केली होती. कपिल देव यांनी वर्ष 1979 आणि 1983 तर जहीर खानने 2002 मध्ये एका कॅलेंडर वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.