Virat Kohli Century: भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे. तब्बल तीन वर्षांनी विराट कोहलीने शतक केलं आहे. विराट कोहलीचं कसोटी करिअरमधील हे 28 वं शतक आहे. यानिमित्ताने विराटने टी-20, वन-डे नंतर आता कसोटी मालिकेतील शतकांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र होण्यासाठी भारताच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया संघ तिसरा कसोटी सामना जिंकत आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र झाला आहे. 



तब्बल 41 डावांनंतर कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं आहे. विराट कोहलीने 243 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं.


पहिल्या डावात विराट कोहली मैदानावर आला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 187 वर दोन गडी बाद अशी होती. कोहली मैदानावर लयीत दिसत होता. तिसऱ्या दिवशी त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कोहली चौथ्या दिवशी पुन्हा मैदानावर उतरला तेव्हा 59 धावांवर नाबाद होता. दरम्यान कोहलीने 44 धावा केल्या तेव्हा घऱच्या मैदानावर 4000 धावांचा टप्पा गाठला. तसंच घरच्या मैदानावरील हे 14 वं शतक आहे. कोहलीने कसोटीतील शतकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला आणि ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची बरोबरी केली आहे.



इंग्लंडचा जो रुट (29) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (30) कोहलीच्या पुढे आहेत. तसंच भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झाल्यास सचिन तेंडुलकर (51), राहुल द्रविड (36) आणि गावसकर (34) यांना अद्याप विराट कोहलीला मागे टाकायचं आहे. 


चौथ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 480 धावा केल्या आहेत. यानंतर भारताने चांगली सुरुवात केली असून फॉलो ऑनची शक्यता कमी झाली आहे. पहिल्या डावात आऱ अश्विनने सहा गडी बाद केले. दरम्यान कोहलीच्या आधी शुभमन गिलने शतक ठोकलं आहे.