Ind vs Aus First T20 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतलाय. पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने पराभव केला. कॅप्टन इनिंग खेळणारा सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजायाचा हिरो ठरला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जातेय. या मालिकेतला पहिला सामना विशाखापट्टनममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियातल्या दिग्गज खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिली फलंदाजी दिली. पण त्याचा हा निर्णय फारसा यशस्वी ठरला नाही. ऑस्ट्रेलियाने आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियासमोर (Team India) विजयासाठी 209 धावांचं आव्हान ठेवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाची फलंदाजी
भारताच्या डावाची सुरुवात उपकर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) केली. पण विजयासाठी 209 धावांचं बलाढ्य आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली.पहिल्यात षटकात ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद झाला. धाव घेण्याच्या नादात तो रनआऊट झाला. यानंतर मैदानावर आलेल्या ईशान किशनच्या साथीने जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा केल्या. यात त्याने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. पण झटपट धावा करण्याच्या नादात सामन्याच्या तिसऱ्याच षटकात तो झेलबाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने तुफान फटेकबाजी करत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. ईशान किशन 58 धावा करुन बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने कॅप्टन इनिंग खेळत 42 चेंडूत 80 धावा केल्या. यात त्याने 4 षटकार आणि 9 चौकारांची बरसात केली. तर रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 


ऑस्ट्रेलियाची तुफानी फटकेबाजी
पहिली फलंदाजी करणाऱ्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने तुफानी फटकेबाजी केली. जोस इंग्लिसने भारतीय युवा गोलंदाजांची पिसं काढत अवघ्या 47 चेंडूत 47 धावा केल्या. इंग्लिस 50 चेंडूत 110 धावा करुन बाद झाला. आपल्या आक्रमक खेळीत त्याने 8 षटकार आणि 11 चौकारांची बरसात केली. इंग्लिसशिवाय अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथनेही 52 धावांची केळी केली. इंग्लिस आणि स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी 67 चेंडूवर 113 धावांची पार्टनरशिप केली. भारताचाही एकही गोलंदाज प्रभाव टाकू शकला नाही. सर्वच गोलंदाजांनी खोऱ्याने धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी एक विकेट घेतली. 


ऑस्ट्रेलियाची विक्रमी धावसंख्या
ऑस्ट्रेलियाची भारताविरोधात टी20 क्रिकेटमधलीही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. याआधी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाने राजकोटच्या मैदानावर 7 विकेट गमावत 201 धावा केल्या होत्या. पण विशाखापट्टनमच्या मैदानावर हा विक्रम मागे पडला. 


भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार


ऑस्ट्रेलिया संघाची प्लेईंग इलेव्हन
स्टीव स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, एरॉन हार्डी, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मैथ्यू वेड (विकेटकीपर, कर्णधार), सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर सांघा