IND vs AUS, Ball Tampering: तुम्हालाही ते क्षण आठवत असतील, जेव्हा मैदानात शतक ठोकणारा स्टीव स्मिथ (Steve smith) एकेकाळी प्रेस कॉन्फरेन्समध्ये ढसाढसा रडला होता. 2018 मध्ये झालेल्या सँडपेपर गेट प्रकरणामध्ये बॉल टॅम्परिंगचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना निलंबन देखील करण्यात आलं होतं. हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील लाजीरवाणं प्रकरण ठरलं. अशातच आता ऑस्ट्रेलियावर पुन्हा बॉल टेम्परिंगचा (Ball Tampering) आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाच्या अशा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांनी घणाघाती आरोप केले आहेत.


काय म्हणाले बासित अली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम मी कॉमेंट्री बॉक्समधून सामना पाहणाऱ्यांसाठी आणि पंचांसाठी टाळ्या वाजवू इच्छितो. मला स्पष्टपणे दिसतंय की, ऑस्ट्रेलियाने चेंडूशी छेडछाड केली आहे. मात्र,  कोणीही त्याबद्दल बोललं नाही. सामन्यात काय होत आहे? एकाच वेळेस दोन्ही फलंदाज सेम पद्धतीने लागोपाठ बाद होतात याच आश्चर्य कोणालाच वाटलं नाही का? असा सवाल बासित अली यांनी विचारला आहे. मी तुम्हाला पुरावा देखील देतो, असं म्हणत बासित यांनी स्पष्ट विश्लेषण केलं आहे.


रिव्हर्स स्विंग म्हणजे जेव्हा चमक आतील बाजूस असते. शमी गोलंदाजी करत असताना बाहेरून चमक होती. त्यावेळी स्मिथ बाद झाला. कोहली आणि पुजारा ज्या प्रकारे बाद झाले. ते बघता 16 ते 18 ओव्हरमध्ये बॉल टॅम्परिंगचे स्पष्ट पुरावे आहेत. 18 व्या ओव्हरला पंच रिचर्ड केटलबरोच्या सूचनेनुसार चेंडू बदलला गेला. भारताची परिस्थिती 30 वर 2 अशी होती. त्यानंतर परिस्थिती 71 वर 4 बाद अशी झाली. 15 ते 20 ओव्हरमध्ये चेंडू कधी रिव्हर्स स्विंग होतो, तोही ड्यूक्स बॉल? असा खडा सवाल बासित अली यांनी विचारला आहे. त्यावेळी त्यांनी बीसीसीआयला देखील खडेबोल सुनावले आहेत.


बीसीसीआय (BCCI)  एवढा मोठा बोर्ड आहे. ते या गोष्टी पाहू शकत नाहीत का? असा सवाल बासित अली यांनी विचारला आहे. कुकाबुरा बॉल असता तर परिस्थिती वेगळी असती. मात्र, ड्युक्स बॉल एवढ्या लवकर कसा काय खराब होतो? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सर्वाच्या भूवया उंचावल्या आहेत.


पाहा Video



दरम्यान, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या दोघांच्या विकेटवर अनेकांनी टीका केली आहे. दोघेही बॉल सोडताना बाद झालेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागतंय. तसेच विराटची विकेट देखील सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. कोहली बॅकफूटवर जाऊन तो चंडू खेळला असता, तर नक्कीच बाद होण्यापासून वाचला असता.