IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी वाईट बातमी; आईच्या निधनामुळे पॅट कमिन्सवर कोसळला दुःखाचा डोंगर
IND vs AUS 4th Test : अहमदाबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाआधीच ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्या आईचे निधन झालं आहे.
IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (BGT 2023) शेवटचा सामना खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद (ahmedabad) येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पाहुण्या संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया (team australia) संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्या (Pat Cummins) आईचे निधन झाले आहे. पॅट कमिन्सच्या आई मारिया या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. प्रकृती बिघडल्यानंतर पॅट कमिन्स दिल्लीतील कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला परतला होता. मात्र मारिया यांचे सिडनीमध्ये निधन झाल्याने कमिन्सवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. "मारिया कमिन्स यांच्या निधन झाल्याने आम्हाला प्रचंड दुःख झाले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या वतीने, आम्ही पॅट आणि कमिन्स कुटुंबियांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियाचा संघ आज श्रद्धांजली म्हणून हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरणार आहे," असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बीसीसीआयकडूनही शोक व्यक्त
बीसीसीआयने देखील पॅट कमिन्स याच्या आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयने ट्विट करत, "पॅट कमिन्सच्या आईच्या निधनाबद्दल भारतीय क्रिकेटच्यावतीने आम्ही शोक व्यक्त करतो. या कठीण काळात आमची प्रार्थना त्याच्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत," असे म्हटले आहे.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले होते. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या संघाने गमावले होते. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या पॅटच्या आईची प्रकृती बिघडली आणि त्याने सिडनीला जाण्याचा निर्णय घेतला. कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियन संघाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून मालिकेत पुनरागमन केले होते. चौथ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.