बंगळुरु : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी भारतीय टीमला दुखापतींनी ग्रासलं आहे. राजकोटच्या दुसऱ्या वनडेवेळी भारताचे ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे हे दोघं तिसरी मॅच खेळणार का नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाले. पण दोघांच्या सहभागाबाबत मॅचच्या काहीवेळ आधी होईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वनडेमध्ये शिखर धवनने ९६ रनची खेळी केली. बॅटिंग करत असताना धवनच्या छातीला बॉल लागला. यानंतर धवनने बॅटिंग केली, पण तो फिल्डिंगला आला नाही. तर सीमारेषेवर बॉल अडवताना रोहित शर्माच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहित पॅव्हेलियनमध्ये गेला आणि पुन्हा मैदानात आला नाही.


शिखर धवन आणि रोहित शर्माची दुखापत बरी होत आहे. त्यांच्या दुखापतीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. हे दोघं शेवटची मॅच खेळतील का नाही? याबाबत काही काळ आधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.


शिखर धवन आणि रोहित शर्मा जर या मॅचमध्ये खेळले नाहीत, तर भारतीय टीम संकटात सापडेल, कारण सध्या भारताकडे तीनच ओपनर आहेत. दुसरीकडे पहिल्या वनडेवेळी बॅटिंग करताना ऋषभ पंतच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे दुखापत झाली. त्यामुळे केएल राहुलने पहिल्या आणि दुसऱ्या वनडेमध्ये विकेट कीपिंग केली. केएल राहुलने बॅटिंग आणि विकेट कीपिंग करताना चांगली कामगिरी केल्यामुळे तिसऱ्या मॅचसाठी पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.


पहिल्या वनडेमध्ये १० विकेटने दारुण पराभव झाल्यानंतर भारताने राजकोटच्या दुसऱ्या वनडेमध्ये जोरदार पुररागमन केलं. शिखर धवन, विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकांमुळे भारताने ३४० रनपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ४९.१ ओव्हरमध्ये ३०४ रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने ही मॅच ३५ रननी जिंकली.


सीरिज सध्या १-१ने बरोबरीत असल्यामुळे बंगळुरुची वनडे निर्णायक ठरणार आहे. मागच्यावर्षी भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-२ने विजय झाला होता. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या. बंगळुरूमध्ये होणारी आजची मॅच जिंकली तर ऑस्ट्रेलिया भारतात लागोपाठ २ वनडे सीरिज जिंकेल.


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी