पर्थ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ११२/५ एवढा होता. पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी १७५ रनची आवश्यकता आहे. पण पर्थची खेळपट्टी बघता भारताला हे आव्हान पार करणं सध्यातरी अशक्य दिसतंय. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हनुमा विहारी २४ रनवर नाबाद आणि ऋषभ पंत ९ रनवर नाबाद खेळत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम २४३ रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमधली शमीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद शमीनं पत्रकारांशी संवाद साधला. टीम निवडताना चूक झाल्याची कबुली मोहम्मद शमीनं दिली आहे.


मॅचमध्ये कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याचे निर्णय टीम प्रशासन घेतं. याबद्दल आम्ही काहीच करु शकत नाही. आमच्या टीममध्ये असलेला एकमेव स्पिनर हनुमा विहारीनं काही खराब कामगिरी केली नाही. पण मला विचाराल तर टीममध्ये एक स्पिनर हवा होता, अशी प्रतिक्रिया शमीनं दिली.


बऱ्याच कालावधीनंतर भारताला एवढे उत्कृष्ट फास्ट बॉलर एकाच वेळी मिळाले आहेत. ४ वर्षांपूर्वी आम्ही एवढे अनुभवी नव्हतो. ४ वर्षांपूर्वीची आमची बॉलिंग आणि आत्ताची बॉलिंग यामध्ये तुम्हालाही फरक जाणवेल, असं वक्तव्य शमीनं केलं. दुसऱ्या बाजूनं एखादा बॉलर चांगली बॉलिंग टाकत असेल, तर त्याचा फायदा होतो. यामुळे दोन्ही बाजूनी विरोधी बॅट्समनवर दबाव राहतो, आणि यामध्येच सामना फिरतो, असं शमी म्हणाला.


भारताचा डाव भारतावरच उलटला


पर्थमधली हिरवीगार खेळपट्टी बघून भारतानं या मॅचमध्ये ४ फास्ट बॉलर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला. अश्विनला दुखापत झाल्यामुळे त्याला या टेस्टला मुकावं लागलं. अश्विनला दुखापत झाली असली तरी भारतापुढे कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजा यांच्या रुपात स्पिनर म्हणून दोन पर्याय होते. ही टेस्ट सुरु होण्याआधी भारतानं जडेजाचा पहिल्या १३ खेळाडूंमध्ये समावेश केला होता. पण खेळपट्टीवरचं गवत पाहून भारत मॅचमध्ये ४ फास्ट बॉलर घेऊन उतरला.


पर्थची खेळपट्टी फास्ट बॉलरना अनुकूल असल्याचं दिसत असतानाच ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायननं आत्तापर्यंत दोन्ही इनिंग मिळून भारताच्या ७ विकेट घेतल्या आहेत. यातल्या ५ विकेट तर लायननं पहिल्या इनिंगमध्येच घेतल्या आहेत. ऑफ स्पिनर असलेल्या लायनची ही कामगिरी बघता भारताला स्पिनर न खेळवण्याची चूक चांगलीच महागात पडली आहे.


इंग्लंडमध्येही अशीच चूक


बॉलरची निवड करताना विराट कोहली आणि रवी शास्त्रीची झालेली ही काही पहिली चूक नाही. याआधी नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्येही भारतानं चूक केली होती. लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये भारत अश्विन आणि कुलदीप यादव असे २ स्पिनर घेऊन खेळला होता. लॉर्ड्सची फास्ट बॉलरना अनुकूल असलेली खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण असतानाही भारतीय टीमनं घेतलेला हा निर्णय त्यांच्या अंगाशी आला, आणि त्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला.