WTC Final 2023 : दुखापतीमुळं दुसऱ्या डावातून रहाणे आऊट? स्वत:च केला मोठा खुलासा
Ajinkya Rahane : साधारण वर्षभराहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेला स्थान मिळालं. या संधीचं सोनं करण्यासाठीच जणू तो मैदानात आला. त्याची खेळी पाहून तरी हेच लक्षात येत होतं.
Ajinkya Rahane's Finger Injury Update: London च्या ओव्हल मैदानात सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून Team India चे खेळाडू काहीसे गोंधळल्याचं पाहायला मिळालं आणि क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला चांगलच झोडपलं.
विरोधी संघाच्या पहिल्या डावानंतर आव्हान घेत भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात आला. यावेळी मह्त्वाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केलेली असतानाच जवळपास 17 महिन्यांनी संघात स्थान मिळालेल्या अजिंक्यनं मात्र त्याच्या खेळातूनच मनातला निर्धार व्यक्त केला.
भारताच्या पहिल्या डावात त्यानं 89 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देत संघाची धावसंख्या 296 पर्यंत पोहोचवण्यास मदत केली. या खेळीदरम्यानच अजिंक्यच्या हाताला दुखापतही झाली. पॅट कमिंसनं टाकलेल्या चेंडूचा फटका त्याच्या हातावर बसला, तो वेदनेनं कळवळवा पण तरीही त्यानं खेळपट्टी मात्र सोडली नव्हती.
दुसऱ्या डावासाठी अजिंक्य तयार आहे ना?
अजिंक्यचा एकंदर संयमी खेळ पाहता त्याच्याकडून संघाच्या अपेक्षा वाढल्या. मुख्य म्हणजे हाच अजिंक्य आपल्या संघासाठी तारणहार ठरणार असा विश्वास क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून गेला. असं असतानाच त्याला झालेल्या दुखापतीनं अनेकांचीच चिंता वाढवली. तिथं ऑस्ट्रेलियाचा संघ क्षणोक्षणी विजेतेपदासाठी नवनव्या पद्धतीचा अवलंब करत असतानाच इथे अजिंक्य दुसऱ्या डावात खेळणार की नाही, हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
हेसुद्धा वाचा : Ajinkya Rahane : तो वेदनेने कळवळत होता तरीही...; दुखापतीनंतरही हार मानायला तयार नाही रहाणे, पाहा व्हिडीओ
खुद्द अजिंक्यनंच यासंदर्भातील चित्र स्पष्ट करत महत्त्वाची माहिती दिली. 'मला वेदना होतायत. पण, त्या सहन करता येण्याजोग्या आहेत. मला नाही वाटत की यामुळं माझ्या फलंदाजीवर कोणताही परिणाम होईल. सध्यातरी मी ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे त्यात मी आनंदी आहे', असं तो म्हणाला.
ज्या कॅमरून ग्रीननं झेल टीपत अजिंक्यला तंबूत परत पाठवलं त्याच्या क्षेत्ररक्षणाचंही त्यानं कौतुक केलं. यावेळी त्यानं सामन्यात ऑस्ट्रेलिया काही पावलं पुढे असल्याची वस्तूस्थिती नाकारली नाही. सामन्यातील पुढच्या दिवसाचा पहिला तास अतिशय महत्त्वाचा असून, त्या सत्रातही बऱ्याच गोष्टी असतील असंही तो म्हणाला. थोडक्यात अजिंक्य सध्यातरी संघातून खेळणार असून, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.