शाबास रे पठ्ठ्या! तरण्याताठ्या पोराचं कौतुक करावं तेवढं कमीच, अर्शदीपची कमाल!
Ind vs Ban T20 World cup 2022 : आजच्या सामन्यातही युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने गोलंदाजीमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर अंतिम षटक टाकत सर्वांची मन जिंकली.
T-20 World Cup 2022 : भारत आणि बांगलादेशमधील (Ind vs Ban T20 World cup 2022) सामन्यामध्ये भारताने 5 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशचं पारडं जड झालं होतं, पावसामुळे भारत सामना गमावणार की काय अशी स्थिती झाली होती. तसं पाहायला गेलं तर उलट झालेलं पाहायला मिळालं. पाऊस आला त्यानंतर बांगलादेशच्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या विकेट्स गेल्या आणि सामना भारताने जिंकत सेमी फायनलचं तिकीट पक्क केलं. (Ind vs Ban T20 World cup 2022 Arshdeep singh brilliant bowling performance in last over helps india to reach semifinal latest marathi sport news)
आजच्या सामन्यातही युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) गोलंदाजीमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर अंतिम षटक टाकत सर्वांची मन जिंकली. पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा चालू झाला तेव्हा बांगलादेशला 151 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. सामना सुरू झाला अन् भारताला पहिली आनंदाची बातमी आली, वादळी खेळी करणारा लिट्टन दास के. एल. राहुलच्या डायरेक्ट थ्रोवर बाद झाला. शमीने दुसरा धक्का दिला, त्यानंतर भारतीय संघाचाही आत्मविश्वास वाढला.
अर्शदीप गोलंगदाजीला आल्यावर त्याने त्याचा जलवा दाखवला. धोकादायक शाकिब अल हसन आणि अफिफ होसन यांना माघारी पाठवत भारताला वापसी करून दिली. त्यानंतर शेवटच्या षटकात बांगलादेशला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज होती. इतका दबाव असताना हा पठ्ठ्या गोलंदाजीला आला. दुसऱ्याच चेंडूवर अर्शदीपला षटकार बसला तर पाचव्या चेंडूवर चौकार तरीही त्याचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला 7 धावांची गरज होती त्यावेळी एक धाव घेत भारताच्या विजायवर शिक्कामोर्तब केलं.
टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये युवा अर्शदीप मोठ्या हिमतीने गोलंदाजी करताना दिसत आहे. सर्वांच्या लक्षात राहणारा सामना म्हणजे त्याने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला शून्यावर माघारी पाठवलं होतं. एकंदरित त्याची शानदार कामगिरी राहिलं आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये अर्शदीपची कामगिरी-
पाकिस्तान 4 षटकं 32 धावा 3 विकेट
नेदरलँड 4 षटकं 37 धावा 2 विकेट
दक्षिण आफ्रिका 4 षटकं 25 धावा 2 विकेट
बांगलादेश 4 षटकं 38 धावा 2 विकेट