मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान हा सामना चेन्नईमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एकतरी बदल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर संभाव्य प्लेइंग इलेवन खेळाडूंची यादी देखील समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतविरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात शाहबाज नदीमला संधी देण्यात आली होती. मात्र त्याची कामगिरी निराशाजनक असल्यानं दुसऱ्या कसोटी सामन्यातून तो बाहेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नादीम संघात राहणार की नाही याचा निर्णय शुक्रवारी होणार आहे.


अक्षर पटेलची प्रकृती चांगली झाली असल्यानं पुन्हा संघात परतणार असल्याची शक्यता आहे. अक्षरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्याने नेटवर फलंदाजी सुरू केली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी बुधवारी दिली. पुढच्या काही दिवसांत तो गोलंदाजीला सुरुवातही केली जाण्याची शक्यता आहे.


भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. शाहबाद नादीमची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. इंग्लंडनं भारतीय संघासमोर धावांचा डोंगर उभा केला होता. तगड आव्हान पेलताना भारताला नाकीनऊ आले होते. आता पुढच्या तीन सामन्यांमध्ये भारताला सामना गमवणं महागात पडू शकतं. याचं कारण जर भारतीय संघ पुन्हा एकदा पराभूत झाला तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून भारतीय संघाला बाहेर जावं लागू शकतं. त्यामुळे पुढचे तीन सामने भारतीय संघाला जिंकणं महत्त्वाचं आहे. 


दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्लेइंग इलेवनसाठी रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवालला संधी मिळू शकते. रहाणेच्या जागी के एल राहुला देखील दुसऱ्या कसोटीमध्ये पुन्हा कमबॅक करण्यात येऊ शकतं. तर नादीमच्या जागी अक्षरला घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे मोठे तीन बदल कर्णधार विराट कोहली करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.