IND vs ENG : टीम इंडियाचा `हा` खेळाडू कोणाच्या वशिल्यावर खेळतोय? रोहित का देतोय सतत संधी?
Rajat Patidar : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात (IND vs ENG 4th test) देखील रजत पाटीदारला चांगली कामगिरी करता आली नाही. सततच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर त्याला आता पाचव्या सामन्यात संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
IND vs ENG, Rajat Patidar : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका (IND vs ENG Test) खेळवली जात आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून युवा खेळाडूंनी या मालिकेत सर्वांचं मन जिंकलंय. टीम इंडियाकडून डेब्यू करणाऱ्या सरफराज, ध्रुव जुरैल आणि आकाश दीप यांच्यासारख्या खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडल्याचं पहायला मिळतंय. मात्र, डेब्यू मालिकेत रजत पाटीदारला (Rajat Patidar) मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून कसोटी पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता आगामी सामन्यात त्याचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) याने खासगी कारणास्तव रजा घेतली होती. त्यामुळे त्याच्या जागी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला होता. तर केएल राहुलच्या दुखापतीमुळे रजतला पुन्हा चौथ्या कसोटीमध्ये संधी मिळाली होती. केएल (KL Rahul) संघात आला तर रजतची सुट्टी नक्की होती. मात्र, राोहितने रजतला आणखी एक संधी दिली. मात्र, चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडिया अडचणीत असताना रजतला मोठी खेळी करता आली नाही. रजत पाटीदार फक्त 17 धावा करून बाद झाला. 42 बॉलचा सामना करत रजतने 4 फोर मारले अन् 17 धावा केल्या. मात्र, शोएब बशीरच्या एका बॉलवर रजत एलबीडब्ल्यू बाद झाला.
विक्रम राठोड म्हणतात...
रजत पाटीदार हा खूप हुशार आणि प्रतिभावान खेळाडू आहे. रजत चौथ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करेल, त्यामुळे त्याला स्वत:ला सिद्ध करण्याच्या आणखी काही संधी मिळणार आहे, असा विश्वास भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना आहे. त्यामुळे आता आगामी पाचव्या सामन्यात रजतला संधी मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
कोण आहे रजत पाटीदार?
मध्य प्रदेशातून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रजत पाटीदारची आतापर्यंतची कामगिरी अप्रतिम आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 55 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 12 शतके आणि 22 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 46.91 आहे. पाटीदारने कसोटीपूर्वी भारतासाठी वनडे पदार्पण केले आहे. रजतने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.