IND vs ENG: इंग्लंडला घाम फुटणार! यॉर्कर माहीर हा गोलंदाज टीम इंडियात परतला
भारत विरुद्ध इंग्लंड पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे.
अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांनी मालिकेत 2-2ने बरोबरी घेतल्यामुळे आता हा सामना अधिक रंजक असणार आहे. दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दाणाणून टाकण्यासाठी खास व्यक्ती येणार आहे.
टीम इंडियासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे टी नटराजन फिट झाला आहे. त्यामुळे प्लेइंग इलेवनमध्ये तो पुन्हा खेळताना दिसणार आहे. टी नटराजन यॉर्कर टाकण्यात माहीर असल्यानं इंग्लंडसाठी टेन्शन वाढणार आहे. तर भारतीय संघासाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
ऑस्ट्रेलियामधील तिन्ही फॉर्मेटमध्ये 'ड्रीम डेब्यू' करणारा 29 वर्षीय टी. नटराजन खांदा आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्ध टी -20 मालिकेच्या पहिल्या 4 सामन्यात खेळू शकला नाही. आता मालिका निर्णयाक वळणावर असताना पुन्हा संघात परतला आहे. नटराजन टी -20 सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. टी. नटराजन खेळण्यामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढेल आणि त्यामुळे मालिका जिंकणं अधिक सोपं होईल असा कयास आहे.
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या टी 20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदरला सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. चौथ्या सामन्यात त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. दुसरीकडे के एल राहुलला संघातून बाहेर ठेवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये के एल राहुलला विशेष यश मिळालं नाही. त्याने 1,0,0 आणि 15 अशा धावा राहुलनं चार सामन्यांमध्ये केल्या आहेत.