IND VS ENG: Lords Test जिंकताच इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतीयांचा झिंगाट डान्स
इंग्लंडमध्ये लोकं रस्त्यावर उतरली आणि ....
IND VS ENG: भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच चांगलीच रंगत पाहायला मिळाली. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर भारतीय संघां डाव पलटला आणि यजमानांना नमवलं.
लॉर्ड्सवर भारतीय संघाच्या नावे क्वचित विजयांची नोंद आहे. त्यात ही कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवून गेली. कारण ही संघाची खऱ्या अर्थानं ऐतिहासिक कामगिरी होती.
सामन्याच्या चौथ्या दिवशी (India) भारतीय संघातील फलंदाजांनी स्वस्तात माघार पत्करली. ज्यामुळं पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासून भारताच्या विजयाच्या आशा धुसर होताना दिसल्या. परंतु इंग्लंडच्या ( England) संघाला काही कळायच्या आधीच भारतीय क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या बळावर सामन्यात पुनरागमन करत डाव खिशात टाकला.
एकच जल्लोष...
भारताच्या खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर मोठ्या आवेगात आणि उत्साहात आनंद साजरा केला. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या लपत नव्हता. एकिकडे मैदानावर खेळाडूंचा आनंदोत्सव सुरु होता, तर दुसरीकडे इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतीय क्रिकेटप्रेमींनी एकत्र येत चक्क मिरवणूक डान्स सुरु केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनुसार इंग्लंडमध्ये लोकं रस्त्यावर उतरली आणि त्यांनी 'सात समुंदर पार मैं तेरे' या गाण्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली.
हातात राष्ट्रध्वज पकडत आणि सामना जिंकल्याचा आनंद साजरा करत ही सर्व मंडळी बेभान होऊन नाचली. हे पाहून मिरवणुकांचा माहोल आठवल्यावाचून राहत नाही, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या.
बुमराह- शमी इंग्लंडसाठी ठरले घातक
पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि शमीच्या फलंदाजीच्या बळावर हा डाव पलटला. 9 व्या विकेटसाठी या खेळाडूंनी 77 धावांची भागीदारी केली. यामध्ये शमी 52 आणि बुमराह 30 धावा करुन बिनबाद तंबूत परतले होते.