मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या `या` कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार
Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे.
IND vs NZ 3rd Test Mumbai: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानला अंपायरने वार्निंग दिली होती.
मुंबई कसोटीत झाला मोठा गोंधळ
मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्फराज खानने असे काही केले की त्याच्याशी अंपायरला बोलावे लागले. याशिवाय सरफराज खानला अंपायरने वार्निंगही देण्यात आली होती. एवढेच नाही तर कर्णधार रोहित शर्माकडेही तक्रार करण्यात आली होती. अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी सरफराज आणि रोहितला बोलावले आणि डावाच्या 32 व्या षटकाच्या आधी तिघांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे दिसून आले. अंपायर साहजिकच नाराज दिसत होते.
सरफराजला का मिळाली वार्निंग?
सामन्यादरम्यान फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षण करणारा सरफराज वारंवार फलंदाजांना काहीतरी सांगत होता. सर्फराज खान इतका बोलत होता की त्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज विचलित होऊ लागले. यानंतर डॅरेल मिशेलने त्याच्याबद्दल अंपायरकडे तक्रार केली. रोहित शर्माने सर्फराजचा बचाव केला आणि त्याचवेळी विराट कोहलीही चर्चेत सामील झाला होता. कर्णधार रोहित शर्माने संभाषण संपवून अंपायरला खात्री दिली. चर्चा संपल्यानंतर त्याने आणि मिशेलने एकमेकांशी हस्तांदोलनही केले.
कसा रंगला सामना?
रवींद्र जडेजा (5 विकेट) आणि वॉशिंग्टन सुंदर (4 विकेट) यांच्यामुळे भारताने शुक्रवारी तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळून चांगली सुरुवात केली, पण संघाच्या 20 मिनिटांतच फलंदाजांनी लय गमावली त्यामुळे पहिल्या डावात 4 गडी बाद 86 धावा झाल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने 65 धावांत पाच बळी घेतले, तर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने 81 धावांत चार विकेट घेतल्या, पण भारताची फलंदाजी ही कमकुवत कडी राहिली आणि संघाने आठ चेंडूंत तीन विकेट गमावल्या. यशस्वी जैस्वाल (30) याने विचित्र रिव्हर्स स्लॉग स्वीप मारला.