कोहलीने मोडला धोनीचा विक्रम, बनला नंबर-१ भारतीय कर्णधार
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा रोमांचक विजय झाला.
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा रोमांचक विजय झाला. सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर ४ रनची गरज असताना रोहित शर्माने सिक्स मारून भारताला जिंकवून दिलं. याचसोबत भारताने ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये ३-०ने विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच टी-२० सीरिज जिंकली आहे.
कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये एमएस धोनीचा विक्रम मोडित काढला आहे. कोहलीने २७ बॉलमध्ये ३८ रन केले. याचसोबत विराट टी-२०मध्ये सर्वाधिक रन करणारा भारतीय कर्णधार झाला आहे. विराटला या मॅचआधी धोनीचा विक्रम मोडण्यासाठी २५ रनची गरज होती. भारतीय कर्णधार म्हणून कोहलीच्या नावावर ३६ मॅचमध्ये १,१२६ रन आहेत. धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये १,११२ रन केले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसिस पहिल्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
फॅफ डुप्लेसिसने ४० मॅचमध्ये १,२७३ रन केले आहेत, तर केन विलियमसनने कर्णधार म्हणून ४२ मॅचमध्ये १,२४३ रन केले आहेत. विराटने त्याच्या ३६व्या मॅचमध्येच १,१०० रनचा टप्पा ओलांडला. एमएस धोनीने ७२ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे.