वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १० विकेटने दारुण पराभव झाला आहे. आता सीरिज वाचवण्यासाठी भारताला क्राईस्टचर्चमधली दुसरी टेस्ट जिंकणं गरजेचं आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या बॅट्समनना सल्ला दिला आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये जास्त सुरक्षित होऊन खेळण्याची गरज नाही, असं विराट म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टेस्टमध्ये भारताला दोन्ही इनिंगमध्ये २०० रनचा आकडाही गाठता आला नाही. परदेश दौऱ्यात जास्त सुरक्षित खेळ फायदा पोहोचवत नाही, असं मत विराटने मांडलं आहे.


'बॅटिंग करताना टीमला आपल्या देहबोलीमध्ये सुधारणा करावी लागेल. जास्त सावध होऊन खेळलं, तर मदत मिळणार नाही, कारण यामध्ये तुम्ही शॉट मारणंच सोडून देता,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


विराट कोहलीचं हे वक्तव्य चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीबाबत आहे, असं बोललं जात आहे. पुजाराने दुसऱ्या इनिंगमध्ये ८१ बॉल खेळून ११ रन केले. एकावेळी तर पुजाराने २८ बॉलमध्ये एकही रन केली नव्हती. त्यामुळे मयंक अग्रवाल जलद रन करण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. तर हनुमा विहारीने १५ रन करायला ७९ बॉल खेळले.


'एकही रन न काढणं आणि चांगल्या बॉलची वाट पाहणं, यामुळे तुम्ही तुमची विकेट द्यायची संधी देता. जर खेळपट्टीवर गवत असेल, तर मी आक्रमण करणंच पसंत करेन, यामुळे टीम पुढे जाईल,' असं वक्तव्य विराटने केलं.