IND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!
आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता लागली आहे. मात्र हा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.
टॉसला विलंब
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबईत पावसामुळे वानखेडेचे आऊटफील्ड ओलं झालं आहे. सुमारे 9:30 वाजता मैदानावरील पंच खेळपट्टीचा आढावा घेतील आणि मग सामना कधी सुरू करायचा याचा निर्णय घेतील. मात्र सध्या आनंदाची बातमी म्हणजे सध्या पाऊस पडत नाहीये.
विराट कोहलीचे पुनरागमन
टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली मुंबई कसोटीत परतला आहे. त्याला कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. विराटच्या जागी अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारली होती.
दुसऱ्या टेस्टवर पावसाचं सावट
मुंबईतील अवकाळी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ विस्कळीत होऊ शकतो. पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे.