VIDEO: उमरान मलिकचा 150 kmh वेगाने तुफान चेंडू, Bail विकेटकिपरच्याही डोक्यावरुन उडून 30 यार्डाच्या बाहेर पडली
भारतीय गोलंदाज उमरान मलिकने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत तब्बल ताशी 150 किमी वेगाने चेंडू फेकला आहे. या चेंडूवर त्याने न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलचा त्रिफळा उडवला. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बेल 30 यार्डच्याही बाहेर उडाली.
Umran Malik India vs New Zealand T20: भारतीय गोलंदाजीची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोलंदाजांच्या यादीत उमरान मलिक (Umran Malik) हे एक नवं नाव दाखल झालं असून, आपल्या जबरदस्त खेळीने क्रीडा क्षेत्राला आपली दखल घेण्यास भाग पाडत आहे. कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतक्या सातत्याने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करण्यास जमलेलं नाही. न्यूझीलंडविरोधात तिसऱ्या टी-20 (Ind vs NZ T20) सामन्यात उमरान मलिकने पुन्हा एकदा ही कमाल करुन दाखवली आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) भारत-न्यूझीलंडमधील तिसरा टी-20 सामना पार पडला. यावेळी भारतीय गोलंदाजाकडून सर्वात वेगाने चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड असणाऱ्या उमरान मलिकने न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल याला पाचव्या ओव्हरमध्ये तंबूत धाडलं.
उमराने ओव्हरचा पहिलाच चेंडू ताशी 146.8 वेगाने टाकला, हा यॉर्कर खेळण्यात ब्रेसवेल अपयशी ठरला. यानंतर उमरानने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर ब्रेसवेल बाद झाला. हा चेंडू उमरानने तब्बल ताशी 150 किमी वेगाने फेकला होता. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बेल अक्षरश: हवेत उडाली. इतकंच नाही तर विकेटकिपर इशान किशन आणि स्लीपला उभ्या सुर्यकुमार यादवच्याही डोक्यावरुन उडून लांब पडली. बेल 30 यार्डच्याही बाहेर गेली होती.
उमरानने या सामन्यात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणार्य़ा मिशेललाही बाद केलं. या सामन्यात उमरानला 2 विकेट्स मिळाल्या.
कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात स्टार खेळाडू ठरला. हार्दिक पांड्याने 16 धावांत 4 विकेट्स घेतल्या. भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंड संघ 12 ओव्हर्समध्ये फक्त 66 धावा करु शकला. न्यूझीलंडची ही सर्वात कमी धावसंख्या असून भारताने तब्बल 168 धावांनी हा सामना जिंकला. टी-20 मधील भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.
शुभमन गिलने या सामन्यात अनेक रेकॉर्ड तोडले. शुभमनने 126 धावा करत जबरदस्त खेळी केली. भारतीय फलंदाजाने टी-20 मध्ये केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. शुभमनने सुरेश रैनाचा रेकॉर्ड तोडला असून टी-20 मध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.