ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमचा पराभव झाला आहे. याचसोबत भारताने ही वनडे सीरिजही गमावली आहे. ३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतरही भारतीय टीमसाठी काही सकारात्मक गोष्टी घडल्याचं कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दोन्ही मॅच चांगल्या झाल्या. या मॅचमध्ये त्यांची अवस्था १९७/८ अशी होती, पण तरीही त्यांनी २७३ पर्यंत मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करताना आमची सुरुवात खराब झाली, पण आम्ही पुनरागमन केलं,' असं विराट मॅच संपल्यानंतर म्हणाला.


'आम्हाला बॅटिंग करताना अडचणी आल्या, पण सैनी आणि जडेजाने चांगली खेळी केली. अय्यरही उत्कृष्ट खेळला. यावर्षी टी-२० आणि टेस्ट क्रिकेटच्या तुलनेत वनडे एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. पण आम्हाला कोणते खेळाडू दबावामध्ये खेळू शकतात, याची माहिती करुन घेणं महत्त्वाचं आहे,' असं विराटने सांगितलं.


'शेवटच्या मॅचमध्ये आम्ही टीममध्ये काही बदल करु शकतो, कारण आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. आम्ही खुलून खेळू आणि निकालाबाबात जास्त विचार करणार नाही,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


'खेळाडूंनी शेवटपर्यंत लढलं पाहिजे. आम्ही ड्रेसिंग रुममधून कोणताही संदेश दिला नाही. सैनी एवढी चांगली बॅटिंग करेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. जर तळाच्या बॅट्समनने अशाप्रकारे चांगला खेळ केला तर मधली फळी आणि सुरुवातीच्या बॅट्समनना प्रेरणा मिळते,' असं वक्तव्य विराटने केलं.