माऊंट मांगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने ही सीरिज ३-०ने गमावली. ३१ वर्षानंतर पहिल्यांदाच भारताने द्विपक्षीय वनडे सीरिजमध्ये व्हाईट वॉश पराभव पत्करला. याआधी १९८८-८९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा ५-०ने पराभव झाला होता. सीरिज गमावल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या पराभवाची कारणं सांगितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्कोअरबोर्ड जसा दिसतोय तेवढ्या मॅच खराब झाल्या नाहीत. खराब परिस्थितीमधून बॅट्समननी पुनरागमन केलं, हे आमच्यासाठी सकारात्मक आहे. आम्ही खराब फिल्डिंग आणि बॉलिंग केली. जिंकण्यासाठी आमच्यामध्ये संयम दिसला नाही,' असं विराट म्हणाला.


'या सीरिजमध्ये जिंकण्यासाठी आम्ही कधीच लायक दिसलो नाही. आम्ही फार खराब खेळलो नाही, पण संधीचा फायदा आम्हाला उचलता आला नाही. नवीन खेळाडूंसाठी हा चांगला अनुभव होता. ते अजूनही तयार होत आहेत,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


'न्यूझीलंडची टीम आमच्यापेक्षा जास्त चांगली खेळली. आमच्यापेक्षा ते जलद खेळले. ३-०ने विजय मिळवण्यासाठी ते लायक होते. टेस्ट सीरिजसाठी आम्ही उत्साहित आहोत. आमच्या टीमचं संतुलन चांगलं आहे. आम्ही टेस्ट सीरिज जिंकू शकतो, पण मैदानात योग्य मानसिकता घेऊन उतरावं लागेल,' असं विराटने सांगितलं.