ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीम यावर्षीची परदेशातली पहिली मॅच खेळण्यासाठी तयार झाली आहे. यासाठी भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीममध्ये शुक्रवारी पहिली टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. ऑकलंडच्या इडन पार्क मैदानामध्ये हा सामना होणार आहे. मॅचच्या एक दिवस आधी कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेऊन कोणाला संधी देणार याबाबत भाष्य केलं, पण ऋषभ पंतला खेळवणार का? याबाबत मात्र विराट स्पष्टपणे बोलला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुलच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर विराट म्हणाला, 'वनडेमध्ये आम्ही जे राजकोटमध्ये केलं तेच करु. राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल. टी-२०मध्ये गोष्टी बदलतात. त्यामुळे राहुल टॉप-ऑर्डरमध्ये बॅटिंग करेल. राहुल विकेट कीपिंग आणि बॅटिंगही चांगली करत आहे. त्यामुळे टीमला स्थिरता मिळाली आहे. आम्ही त्याच्यासोबतच जाऊ.'


विराटने वनडेबाबत हे वक्तव्य केलं असलं तरी टी-२०साठी त्याने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मासोबत ओपनिंगला राहुल खेळेल. यानंतर कोहली, श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे बॅटिंगला येतील, पण ऋषभ पंतला टीममध्ये घेतलं तरच हे शक्य होईल. दुसरीकडे संजू सॅमसनला संधी दिली तर तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल, मग कोहली चौथ्या आणि श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर खेळावं लागेल. त्यामुळे टी-२०साठी सॅमसन किंवा पंत यांच्यापैकी एकालाच संधी मिळेल.


भारतीय टीमने मागच्या वर्षी ऑकलंडमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे या मैदानात आत्मविश्वासाने टीम इंडिया उतरेल.


भारतीय टी-२० टीम 


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव