Ind vs Pak सामन्यात आज जोरात पाऊस पडावा म्हणून प्रसादची प्रार्थना! म्हणाला, `हा निर्लज्जपणा...`
Ind vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Rain: एकीकडे सर्व चाहते आजच्या राखीव दिवशी पाऊस पडू नये यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले असतानाच व्यंकटेश प्रसाद यांनी मात्र आज जोरदार पाऊस पडावा असं म्हटलं आहे.
Ind vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Rain: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आशिया चषक स्पर्धेमधील सुपर-4 दरम्यानचा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या नियोजित सुपर-4 सामन्यादरम्यान 24 ओव्हर झाल्यानंतर जोरदार पाऊस आहे. हा पाऊस रात्री उशीरापर्यंत न थांबल्याने नाइलाजास्तव सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या राखीव दिवसावर मागील काही दिवसांपासून जोरदार टीका केली जात आहे. सुपर-4 मध्ये एकूण भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा संघ पोहोचले आहेत. मात्र यापैकी केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. याच राखीव दिवसावरुन भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. एकीकडे आज पाऊस पडू नये आणि भारत-पाकिस्तान सामना निकाली निघावा अशी सर्व क्रिकेट चाहते प्रार्थना करत असतानाच व्यंकटेश प्रसादने मात्र आज म्हणजेच राखीव दिवशी कालपेक्षाही जोरदार पाऊस पडावा अशी इच्छा काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. नेमकं त्याने काय म्हटलं होतं पाहूयात..
नेमकं घडलंय काय?
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याला आणि अंतिम सामन्यालाच राखीव दिवस ठेवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच व्यंकटेश प्रसादने सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा सोशल मीडिया मॅनेजर असलेल्या असीफ अहमदने आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन (पूर्वीचं ट्वीटर) एक पोस्ट केली. यामध्ये त्याने, काही वृत्तांनुसार केवळ भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यासाठी राखीव दिवस असेल. हे खरं असेल तर हे क्रिकेटसाठी फार लज्जास्पद आहे, असं म्हटलं होतं. तसेच ते आपल्याला अप्रत्यक्षपणे हा संदेश देऊ पाहत आहेत की आशिया चषक स्पर्धेमध्ये ब्रॉडकास्टर्सला केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच गट असे बनवण्यात आले आहेत की भारत आणि पाकिस्तान वारंवार एकमेकांसमोर येतील. आता ते केवळ या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवत आहेत.
असा राखीव दिवस ठेवणं बांगलादेश आणि श्रीलंकेशी दुजाभाव करण्यासारखं नाही वाटत का? जर राखीव दिवस ठेवणार होते तर तो सर्व सामन्यासाठी ठेवायला हवा होता केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी नाही. जो कोणी याला समर्थन करत असेल तो क्रिकेटवर प्रेम करत नाही, असं असीफ अहमदने म्हटलं आहे.
प्रसाद म्हणाला, हा निर्लज्जमपणा...
असीफ अहमदचं हेच ट्वीट रिट्विट करुन व्यंकटेश प्रसादने प्रतिक्रिया नोंदवली आहे. "हे खरं असेल तर खरोखरच हे फार लज्जास्पद आहे. आयोजकांनी नियमांची थट्टा केली असून अशाप्रकारे अन्य 2 संघांसाठी वेगळे नियम ठेऊन स्पर्धा आयोजित करणं तत्वांना धरुन नाही. जर न्याय करायचा असेल तर पहिल्या दिवशी पाऊस झाला तर दुसऱ्या दिवशी आणखीन जोरात पाऊस पडायला हवा आणि हे चुकीच्या हेतूने केलेलं नियोजन फसायला हवं," असं व्यंकटेश प्रसादने 8 तारखेला केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, आज भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये एकही चेंडू खेळवण्यात आला नाही तर दोन्ही संघांना 1-1 पॉइण्ट वाटून दिला जाईल. यामुळे पाकिस्तानी संघाची अंतिम सामन्याची वाट सुखकर होणार असून भारताच्या अडचणी वाढतील.