नवी दिल्ली : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T 20I Series 2022) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय. या मालिकेत मुख्य खेळाडूंना विश्रांती आणि युवांना संधी देण्यात आली आहे. केएल राहुल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. (ind vs sa 1st team india chance to braek afghanistan and romania most 12 conscutive t20i matche win record)


वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला सलग सर्वाधिक टी 20 सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची नामी संधी आहे. सध्या अफगाणिस्तान, रोमानिया आणि टीम इंडिया या तिन्ही संघांच्या नावावर संयुक्तरित्या सर्वाधिक सलग 12 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड आहे.


भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात या वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. विराटनंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) सार्थपणे सलग विजयाची मालिका कायम राखली.


आता रोहितला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे केएलला आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला विजयी करुन वर्ल्ड रेकॉर्ड संघाच्या नावे करुन देण्याची नामी संधी आहे.


अशी झाली सुरुवात..... 


टीम इंडियाने टी  20 वर्ल्ड कप 2021 पासून या विजयाची मालिका सुरु केली. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबिया या तिन्ही संघावर सलग विजय मिळवला. यानंतर विराट सांगितल्यानुसार टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरुन पायऊतार झाला.


विराटने नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया अजूनही टी 20 मालिकेत अजिंक्य राहिली. रोहितने आपल्या कॅप्टन्सीत टी 20 मालिकेत अनुक्रमे न्यूझीलंड, वेस्टइंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला. अशा प्रकारे टीम इंडियाने सलग 12 टी 20 सामने जिंकण्याचा अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या विक्रमाची बरोबरी केली.


दरम्यान आता केएलवर युवा खेळाडूंची मोट बांधत टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्डचा साक्षीदार करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात बी टीम इंडियाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


पहिला सामना कधी आणि कुठे? 


टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.