मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे.या मालिकेतला दुसरा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर अनेक क्रिकेटप्रेमींना त्याच्या डेब्युची उत्सुकता लागलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना रविवारी म्हणजेच आज 12 जून रोजी होणार आहे. ओडिशातील कटक येथे होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.  


दिल्लीत झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. गोलंदाजीत उणीवांमुळे हा पराभव झाल्याचा कयास आहे. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात चांगल्या गोलंदाजांना संधी देण्याची शक्यता आहे.  


उमरानवर सगळ्यांच्या नजरा
आयपीएलमधील आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे चर्चेत आलेल्या आणि सध्या टीम इंडियाच्या संघात असलेल्या उमरान मलिकवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.त्याला दिल्लीच्या टी-20मध्येही संधी मिळाली नाही, तर कटकमध्ये त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत शंकांचे ढग आहेत. मात्र उमरान मलिकचा संघात प्रवेश झाला तर टीम इंडियाची गोलंदाजीची ताकद आणखीण मजबूत होणार आहे.
 
'या' खेळाडूला बाहेर बसावे लागणार 
पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने आवेश खान या वेगवान गोलंदाजाला संधी दिली होती. तर दुसऱ्या टी20 सामन्यात उमरान मलिकला संधी देण्याची शक्यता आहे. जर उमरानला संधी दिली तर आवेश खानला बाहेर बसावे लागू शकते.


संभाव्य टीम इंडिया : इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान/ उमरान मलिक


संभाव्य दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, रॉसी डुसेन, डेव्हिड मिलर, टी. स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्सिया, लुंगी एनगिडी, तबरेझ शामसी