केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. मात्र जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टीमने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही सामन्यांनंतर आता सीरीज 1-1 अशी बरोबरीत आहे. मुख्य म्हणजे टीम इंडिया अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी सीरीज जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना केपटाऊनच्या मैदानावर इतिहास रचण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे या मैदानावर भारताने आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाहीये.


टीम इंडियाने केपटाऊनमध्ये आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळलेत. मात्र या मैदानावर टीम इंडियाने एकदाही विजयाची चव चाखलेली नाही. या मैदानावर भारताचे दोन सामने अनिर्णित राहिलेत, तर तीनमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. 2018 मध्ये या मैदानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शेवटचा कसोटी सामना खेळली होती. त्यावेळीही 72 रन्सनी भारताचा पराभव झाला होता.


भारताने केपटाऊनच्या मैदानावर जानेवारी 1993 मध्ये पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. जवागल श्रीनाथची घातक गोलंदाजी आणि सचिन तेंडुलकरच्या अर्धशतकी खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला. 1997 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारत दुसऱ्यांदा खेळला. या सामन्यात सचिन तेंडुलकर 169 आणि मोहम्मद अझरुद्दीन 113 यांच्या शतकी खेळीनंतरही भारताचा 282 धावांनी पराभव झाला.


टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना देखील कर्णधार म्हणून याच मैदानावर पराभव पत्करावा लागला आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा 5 विकेट्स राखत पराभव केला होता.


2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरली होती. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 146 रन्सची खेळी केली होती. याशिवाय गौतम गंभीरने पहिल्या डावात 93 आणि दुसऱ्या डावात 64 रन्स करत भारताला पराभवाच्या छायेतून वाचवलं होतं. 


2018 मध्ये केपटाऊनमध्ये टीम इंडियाने अत्यंत खराब कामगिरी केली होती. टीम पहिल्या डावात 209 आणि दुसऱ्या डावात 135 रन्समध्ये आटोपलाी होती. यावेळी हार्दिक पांड्याने पहिल्या डावात 93 रन्स केलेले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे त्यावेळी फ्लॉप ठरलेले.