`गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...`, 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलं
Slamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.
Slamed Gambhir For Wasted Chance: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमधील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात हातातोंडाशी आलेला विजयाचं रुपांतर श्रीलंकेने अनिर्णित सामन्यात केलं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये अवघ्या 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. भारताने दुसरा सामना 32 धावांनी गमावला आहे. आता या मालिकेमध्ये एकच सामना शिल्लक असताना भारत 0-1 ने पिछाडीवर असून अंतिम सामन्यात तरी भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं असतानाच भारताच्या या सुमार कामगिरीचं खापर आता नव्यानेच प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतलेल्या गौतम गंभीरवर फोडलं जात आहे.
गंभीरच्या प्रयोगांमुळे अपयश?
गौतम गंभीरच्या सल्ल्यानुसारच अंतिम 11 खेळाडू निवडले जातात, गंभीरच्या सांगण्यावरुनच प्रायोगिक तत्वावर फलंदाजांचा क्रम बदलला जात असल्याची चर्चा आहे. याच प्रयोगांचा फटका भारताला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये बसल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. असं असतानाच आता गंभीरचा माजी सहकारी आणि इंडियन प्रिमिअर लीगमध्ये एका संघाचं प्रशिक्षक पद भूषवत थेट पहिल्याच सिझनमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या प्रशिक्षकाने गंंभीरच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत त्याच्यावर टीका केली आहे.
विराट, रोहितचं नाव घेत गंभीरला झापलं
रविवारी भारताने मालिकेमधील दुसरा सामना गमावल्यानंतर सोनी स्पोर्ट्सवर बोलताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज तसेच गुजरात टायटन्सला प्रशिक्षक देणाऱ्या आशिष नेहराने गौतम गंभीरला चांगलेच झापले. गंभीरने शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल केला पाहिजे की नाही? असा प्रश्न नेहराला विचारण्यात आला होता. यावर बोलातना नेहराने गंभीरच्या सांगण्यावरुन विराट कोहली आणि रोहित शर्मा ही मालिका खेळण्यासाठी तयार झालेले असतानाही प्रशिक्षक असलेल्या गंभीरला या खेळाडूंचा योग्य उपयोग करुन घेता आला नाही, असा टोला लगावला. गंभीरने या दोघांना संधी देण्याऐवजी तरुणांना प्राधान्य द्यायला हवं होतं असंही नेहरा म्हणाला. गंभीरने कोहली आणि रोहितला परत बोलावून गोंधळ घातला असं म्हणत नेहराने या दोघांना दिलेली विश्रांती अधिक काळ लांबवता आली असती आणि सप्टेंबरमध्ये घरच्या मैदानावरील मालिकेतून त्यांना मैदानात उतरवता आलं असतं, असं नेहराने स्पष्टपणे आपलं मत मांडताना म्हटलं.
गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...
"भारत पुढील मालिका 2 ते 3 महिन्यांनी खेळणार असून आपल्यासारख्या क्रिकेट खेळणाऱ्या देशासाठी हे थोडं विचित्र आहे. त्यामुळेच रोहित आणि विराटसारख्या खेळाडूंऐवजी या मालिकेमध्ये इतरांना संधी द्यायला हवी होती. मला कल्पना आहे की गंभीर नव्यानेच प्रशिक्षक म्हणून रुजू झाला आहे. त्यामुळे त्याला अनुभवी खेळाडूंबरोबर वेळ घालवावासं वाटणं सहाजिक आहे. मात्र तो त्या दोघांना अगदीच ओळखत नाही असाही प्रकार नव्हता. तो काही परदेशी प्रशिक्षक नाहीये की ज्याला विराट आणि रोहितबरोबर जुळून घेण्यासाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही मालिका गंभीरसाठी नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी उत्तम होती, मात्र त्याने ती संधी गमावली. घरगुती मालिकांमधून विराट आणि रोहितला परत संघात घेता आलं असतं. आताचं धोरण अगदीच चुकीचं आहे असं नाही. मात्र या मालिकेमध्ये त्याला वेगळा विचार करण्याची संधी होती," असं नेहराने अगदीच स्पष्टपणे आलं मत मांडताना सांगितलं.