मुंबई : भारत आणि श्रीलंकेतली गुवाहाटीची पहिली टी-२० रद्द झाल्यामुळे बीसीसीआय नाराज झाली आहे. रविवारी गुवाहाटीमध्ये पाऊस थांबल्यानंतर कव्हर्स काढताना खेळपट्टीवर पाणी सांडलं. खेळपट्टीवर टाकलेली ही कव्हर्स फाटलेली असल्यामुळे खेळपट्टीत पाणी गेल्याचं समोर आलं आहे. तसंच खेळपट्टी सुकवण्यासाठी ड्रायर आणि व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करण्यात आला. हा सगळा प्रकार बीसीसीआयच्या पसंतीस पडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकरणानंतर आता बीसीसीआय मुख्य क्युरेटर आशिष भौमिक यांच्या रिपोर्टची वाट बघत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने भौमिक आणि सीईओ राहुल जोहरी यांच्याकडे बोट दाखवलं आहे.


लोढा समितीच्या शिफारसी लागू केल्यानंतर राज्य संघाच्यासमोर अशा गोष्टी येतील. राज्य संघांना अशाप्रकारच्या गोष्टी सोडवण्याची संधी देण्यात आली नाही. यासाठी बीसीसीआय क्युरेटर आणि सीईओ यांना जबाबदार धरलं पाहिजे, कारण स्टेडियममध्ये आवश्यक गोष्टी आहेत का? हे पाहणं त्यांची जबाबदारी आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


मैदान सुकं होतं पण खेळपट्टी ओली असल्यामुळे प्रेक्षकांना निराश परतावं लागलं. जर एखादा माजी अधिकारी, सल्लागार म्हणून त्यांच्यासोबत असता तर मदत मिळाली असती, असं आणखी एक बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आम्ही माजी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यायला घाबरतो. सर्वोच्च न्यायालयाने माजी अधिकाऱ्यांना सल्लागार म्हणून नेमण्याला हरकत नसल्याचं सांगितलं आहे, तरी आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, असं वक्तव्य या अधिकाऱ्याने केलं.


सौरव गांगुलीच्या नेतृत्वातल्या अधिकाऱ्यांच्या टीमवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते सगळ्या राज्य संघांबरोबर चांगलं काम करतील आणि लवकरच सगळं ठीक होईल. भविष्यात अशाप्रकारच्या घटना समोर येणार नाहीत, असं एक माजी अधिकारी म्हणाला.


बीसीसीआयचे क्रिकेट संचालन महाप्रबंधक सबा करीम यांनाही गुवाहाटीच्या या प्रकाराबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या गोष्टींमध्ये लक्ष देत नाही. पण जेव्हा मुख्य क्युरेटरचा रिपोर्ट येईल तेव्हा मला याबाबत भाष्य करता येईल, असं सबा करीम म्हणाले.