एक ओव्हरमध्ये व्हिलनचा हिरो झाला हा घातक बॉलर, वेस्टइंडिज टीमचा विजयाचा घास हिसकावला
टीम इंडियाने रंगतदार झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.
मुंबई : टीम इंडियाने रंगतदार झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल हा 20 व्या ओव्हरमध्ये व्हिलन ठरता ठरता हिरो ठरला. हर्षल पटेलने टाकलेल्या या ओव्हरमुळेच टीम इंडियाचा या सामन्यात विजय झाला. (ind vs wi 2nd t20i bowler harshal patel game changer 20 th over bowled and team india win match)
हर्षल सामन्यात सुरुवातीपासून लय सापडत नव्हती. त्याला अपेक्षित बॉलिंग टाकता येत नव्हती. हर्षलने याआधीच्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या होत्या. यानंतरही कॅप्टन रोहित शर्माने हर्षलला सामन्यातील शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर टाकायला दिली. विंडिजला विजयासाठी 25 धावांची गरज होती.
विंडिजकडून रॉमव्हेन पोवेल आणि किरॉन पोलार्डसारखे आक्रमक फलंदाज मैदानात होते. मात्र हर्षलने कॅप्टन रोहित शर्माने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
विंडिजच्या आक्रमक फलंदाजाची जोडी हर्षलच्या भेदक माऱ्यासमोर निष्प्रभ ठरली. विंडिजच्या या हिट जोडीला 25 पैकी फक्त 16 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाचा 8 धावांनी विजय झाला. यासह हर्षल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
याच हर्षलने आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाका केला होता. हर्षलने 14 व्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. तसेच हर्षल एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. या चमकदार कामगिरीच्या जोरावरच त्याला टीम इंडियामध्ये घेण्यात आलंय. त्यामुळे हर्षलकडून आगामी काळात अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.