Ind Vs Wi : सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजला धू-धू धुतलं; तिसरा सामना भारताच्या खिशात
आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने भारताला 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. जे टीम इंडियाने सहज गाठलं आणि सामना 7 विकेटने जिंकला. आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने पुढे आहे.
वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी 76 रन्सची तुफानी इनिंग खेळली. सूर्याला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्यांनी सर्वांची बोलतीच बंद केली. आपल्या खेळीत त्याने 8 फोर, 4 सिक्स लगावले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
कर्णधार रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्याने सुरुवातीला पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. सूर्यकुमार यादवशिवाय ऋषभ पंतनेही 26 चेंडूत 33 रन्सची नाबाद खेळी खेळली. यांच्याशिवाय श्रेयस अय्यरने 24 आणि हार्दिक पांड्याने 4 रन्स केले.
वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली, पण त्यांच्या विकेट्स मध्येच पडत राहिल्या. मात्र, अखेरीस रोव्हमन पॉवेल (23 रन्स) आणि शिमरॉन हेटमायर (20 रन्स) यांच्या दमदार फलंदाजीमुळे धावसंख्या 164 पर्यंत पोहोचली. या दोन फलंदाजांनी मिळून 19 बॉल्समध्ये 34 रन्सची भागीदारी केली.
काइल मेयर्सने वेस्ट इंडिजकडून 93 रन्सची मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने 8 फोर आणि 4 सिक्सही मारले. या सामन्यात टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने 2, तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने 1-1 विकेट घेतली.