`15 वर्षांनंतर या आकड्यांना काही अर्थ नाही, पण..`; विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
Virat Kohli : वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 76 वं शतक ठोकलं आहे. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
India vs West Indies 2nd Test : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) तब्बल पाच वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्यात हे शतक झळकावले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने शॅनन गॅब्रिएलच्या चेंडूला चौकारावर ठोकून आपले शतक पूर्ण केले. कोहलीने 180 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे 29 वे शतक होते. या शतकासह विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. कोहलीने 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने बऱ्याच कालावधीनंतर देशाबाहेर कसोटी शतक झळकावले आहे. तत्पूर्वी, त्याने 16 डिसेंबर 2018 रोजी पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध देशाबाहेर आपले शेवटचे कसोटी शतक पूर्ण केले होते. त्यानंतर 1677 दिवस आणि 31 डावांनंतर त्याने परदेशी भूमीवर कसोटी शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीचे हे तिसरे कसोटी शतक ठरले. यापूर्वी त्याने नॉर्थसाऊंड (200) आणि राजकोट कसोटी (139) शतके झळकावली होती.
सामना संपल्यानंतर विराट कोहलीने तब्बल पाच वर्षांनंतर देशाबाहेरच्या मैदानावर शतक ठोकण्याच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. "या लोकांच्या बोलायच्या गोष्टी आहेत. मी घरापासून दूर 15 शतके झळकावली आहेत, हा काही वाईट रेकॉर्ड नाही. मी घरच्या मैदानापेक्षा देशाबाहेर जास्त शतके झळकावली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या क्षमतेनुसार चांगले खेळतो. मी बाहेरच्या मैदानावर फक्त 30 सामने खेळलो नाही आणि या काळात मी अनेक वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत," असे विराट म्हणाला.
"मला माझ्या संघासाठी शक्य तितके योगदान द्यायचे आहे. जर मी 50 धावा काढल्या तर असे वाटते की माझे शतक हुकले. जर माझ्या 120 धावा झाल्या तर असे वाटते की माझे द्विशतक हुकले आहे. 15 वर्षांनंतर या आकड्यांना काही अर्थ उरणार नाही, मी प्रभाव पाडला की नाही हेच त्यांच्या लक्षात राहिल," असेही विराट म्हणाला.
जगातला पहिला फलंदाज
दरम्यान, विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 500 वा सामना असून त्याने देशाबाहेरील मैदानावरील शतकाचा दुष्काळ संपवला आहे. आकोहली 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासोबत त्याने 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने पहिल्या 500 सामन्यांमध्ये 75 शतके झळकावली होती, तर आता कोहलीने तेवढ्याच सामन्यांमध्ये 76 शतके आहेत.