हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही टीम पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर लक्ष ठेवून काही प्रयोग करण्याची शक्यता आहे. टी-२० सीरिजनंतर या दोन्ही टीममध्ये वनडे सीरिजही होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने याच वर्षी ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सीरिजच्या सगळ्या मॅच जिंकल्या होत्या. तर बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचा विजय झाला होता. बांगलादेशविरुद्धच्या सीरिजसाठी विराटला विश्रांती देण्यात आली होती. पण आता विराटचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. यामुळे टीम आणखी मजबूत झाली आहे.


भारतीय टीममध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यासारखे बॅट्समन आहेत. तर विकेट कीपर म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे पर्याय आहेत. भारताच्या बॅटिंगमध्ये फार काही बदल व्हायची शक्यता कमी आहे, पण बॉलिंगमध्ये मात्र प्रयोग दिसू शकतात.


भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चहर यांच्यापैकी दोन फास्ट बॉलरना संधी मिळेल, तर ऑलराऊंडर शिवम दुबेला तिसरा फास्ट बॉलर म्हणून वापरलं जाईल. स्पिन बॉलरमध्ये युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे पर्याय आहेत. यांच्यापैकी २ खेळाडूंना अंतिम ११मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.


मागचे २ टी-२० वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजचा सध्याचा फॉर्म फारसा चांगला नाही. मागच्या ६ टी-२० मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अफगाणिस्तानविरुद्धची सीरिजही वेस्ट इंडिजला गमवावी लागली होती.


भारताची संभाव्य टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल


वेस्ट इंडिजची टीम


कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन एलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रेंडन किंग, एव्हिन लुईस, खैरी पियरे, निकोलास पूरन, दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स, हेडन वॉल्स ज्युनियर