अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा
पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यांच्या या टीमचं नेतृत्व उत्तर प्रदेशमधल्या मेरठच्या प्रियम गर्गला देण्यात आलं आहे. अंडर-१९ वर्ल्ड कप १९ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. ४ वेळा चॅम्पियन झालेली टीम इंडिया यंदा हा किताब वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली ही स्पर्धा जिंकली होती.
हा १३वा अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कप आहे. या स्पर्धेत १६ टीम सहभागी होणार आहेत. टीम इंडियाला ४ टीमसह ग्रुप एमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपानच्या टीम आहेत. प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-२ टीम सुपर लीग स्टेजमध्ये प्रवेश करणार आहेत.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड करायला एनसीए अध्यक्ष राहुल द्रविड मुंबईत आला होता. मागच्यावेळी टीम इंडिया अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकली तेव्हा राहुल द्रविड प्रशिक्षक होता.
अंडर-१९ वर्ल्ड कपसाठीच्या टीमची घोषणा रविवारीच होणार होती, पण सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या फायनलमुळे ही निवड पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी सकाळी बीसीसीआयने टीमची घोषणा केली.
अंडर-१९ वर्ल्ड कप टीम
प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेट कीपर), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलकर, कुमार कुशाग्र (विकेट कीपर), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील