India vs Malaysia: चक दे इंडिया! भारतानं कोरलं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव; मलेशियाचा 4-3 ने पराभव
India vs Malaysia: भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला.
India vs Malaysia: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर खेळवला गेला. भारत आणि मलेशिया (India vs Malaysia Final) यांच्यात झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला. उत्तरार्धापर्यंत मलेशियाचा संघ 3-1 असा आघाडीवर होता. भारताने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे.
भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानच्या नावावर ३ खिताब आहेत. मलेशियाचा हा पहिलाच अंतिम सामना होता. याआधी भारताने 2011, 2016 आणि 2018 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते. तब्बल पाच वर्षानंतर भारताने या चषकावर नाव कोरलं आहे.
सामन्यात नेमकं काय झालं?
अंतिम सामन्यात मलेशियाने वेगवान सुरुवात केली पण पहिला गोल भारताने केला. 9 व्या मिनिटाला संघाला पेनल्टी मिळाली. जुगराज सिंगने पेनल्टी घेत गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताला दोन पेनल्टी मिळाल्या मात्र संघाला गोल करता आला नाही. अबू कमाल अझराईने 14व्या मिनिटाला संघासाठी गोल केला आणि स्कोअर 1-1 झाला. दुसऱ्या क्वार्टरच्या 17 व्या मिनिटाला मलेशियाच्या संघाने दुसरा गोल नोंदवला. दुसऱ्या क्वार्टरच्या 27 व्या मिनिटाला मलेशियाने पेनल्टी कॉर्नर मिळवला. तिसरा गोल करत मलेशियाने 1-3 ने आघाडी घेतली आणि टीम इंडिया पराभवाच्या उंभरठ्यावर आली.
भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या क्वार्टरअखेर भारताने काही सेकंदात दोन गोल केले. पहिला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. यानंतर गुरजंत सिंगने लगेच गोल केला अन् भारत आणि मलेशियाचा स्कोअर 3-3 असा झाला. आकाशदीप सिंगने 56व्या मिनिटाला संघासाठी हा गोल केला आणि भारताच्या पारड्यात विजय आणून ठेवला.