India Vs New Zealand Toss Fixing Allegation On Rohit Sharma: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री घेतली आहे. पहिल्या सेमी-फायनलमध्ये भारताने मुंबईतील वानखेडे मैदानावरील सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाला 70 धावांनी पराभूत करुन 2019 च्या पराभवाचा चांगलाच वचपा काढला. आधी फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये भारतीय संघाने कमाल केली. या सामन्यातील टॉस अत्यंत महत्त्वाचा होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. वानखेडेच्या मैदानावर झालेल्या वर्ल्ड कपच्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला असल्याने रोहितने प्रथम फलंदाजी निवडली. हा निर्णय योग्य ठरला आणि भारताने तब्बल 397 धावांचा डोंगर उभा केला. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर तंबूत परतला. मात्र या सामन्यानंतर आता पाकिस्तानमधून टॉस फिक्सिंगचा गंभीर आरोप भारतावर केला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या टॉस उडवण्याच्या शैलीवर आक्षेप घेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.


सामन्यात काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने या सामन्यात टॉस उडवला आणि तो जिंकला. रोहितने टॉस जिंकल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारताचा टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला. सुरुवातीला रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं तुफान फलंदाजी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित अर्धशतक होण्याआधीच बाद झाला. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने विक्रमी 50 वं शतक झळकावलं. त्यापाठोपाठ आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावलं. शुभमन गिल रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला पण सामन्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजीसाठी आला. या सर्वांच्या खेळीच्या जोरावर भारताने 4 बाद 397 अशी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडला हे आव्हान पेलवलं नाही आणि 7 चेंडू बाकी असतानाच न्यूझीलंडचा संघ तंबूत परतला. कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी कडवी झुंज दिली. 


रोहितवर टॉस फिक्सिंगचा आरोप


भारताच्या विजयानंतर पाकिस्तानमधील पी टीव्ही या वृत्तवाहिनीवर बोलताना पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला. सिकंदर बख्त यांनी क्रिकेटविषयक कार्यक्रमामध्ये टॉसबद्दल बोलताना, "रोहित शर्मा टॉस करतो तेव्हा तो दूर नाणं फेकतो. दुसऱ्या टीमचा कर्णधार कधीच जाऊन टॉस चेक करत नाही," असं म्हणत आपला आक्षेप नोंदवला. यानंतर सिकंदर बख्त यांनी ट्वीटरवरुन रोहित शर्मा कसं नाणं फेकतो आणि इतर कर्णधार कसं नाणं फेकतात याचा तुलनात्मक व्हिडीओ शेअर केला आहे.


नक्की वाचा >> 'जे हरामखोर भारतीय...'; भारत Final मध्ये पोहचल्यानंतर गावसकर Live कार्यक्रमात संतापले 


"रोहित शर्मा टॉसच्या वेळी नाणं दूर का फेकतो? हे फारच विचित्र आहे. इतर कर्णधार हे असं करताना दिसत नाहीत," असं हा व्हिडीओ शेअर करताना सिकंदर बख्त यांनी म्हटलं आहे.



टॉस टिव्हीवर दाखवा


अन्य एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रिकेटविषयक तज्ज्ञाने रोहित शर्मा कधीच ठरवून दिलेल्या जागी नाणं टाकत नाही. तो काही अंतरावर नाणं जाईल इतकं दूर फेकतो. तो असं मुद्दाम करतो का हे तपासलं पाहिजे. टॉस करताना काटा की छापा हे प्रेक्षकांनाही कॅमेरामधून दाखवलं पाहिजे. टॉस केल्यानंतर काटा पडला की छापा हे ही टीव्हीवर दाखवायला हवं अशी मागणी चर्चेदरम्यान केली. 



यापूर्वीही पाकिस्तानमधील कथित क्रिकेट तज्ज्ञांनी भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जातो तो अधिक वळतो असा विचित्र दावा केला होता.