मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला. या विजयानंतरही आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण या विजयामुळे भारत आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडमधलं अंतर कमी झालं आहे. भारताला आता टेस्टनंतर वनडे क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. आयसीसीच्या क्रमवारीमध्ये इंग्लंड १२६ पॉईंटसह पहिल्या आणि भारत १२२ पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजआधीच भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो. यासाठी वेस्टइंडिजला इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज जिंकावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ मॅचच्या या वनडे सीरिजमध्ये वेस्टइंडिजचा ३-२नं विजय झाला तर इंग्लंडचे १२१ पॉईंट होतील. यामुळे १२२ पॉईंट असलेला भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. पण इंग्लंडनं वनडे सीरिज ३-२नं जिंकली तर त्यांच्या खात्यात १२३ पॉईंट्स राहतील. या परिस्थितीमध्ये भारत १२२ पॉईंटसह दुसऱ्याच क्रमांकावर राहिल. वेस्टइंडिजनं इंग्लंडचा ४-१नं पराभव केला तर इंग्लंडचे १२० पॉईंट्स आणि ५-०नं पराभव केला, तर ११८ पॉईंट होतील.


वेस्टइंडिजच्या या दौऱ्यामध्ये इंग्लंडची टीम खराब फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचा बारबाडोसमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ३८१ रननी आणि एन्टीग्वामध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये १० विकेटनी पराभव झाला. तिसऱ्या टेस्टनंतर वेस्टइंडिज आणि इंग्लंडमध्ये २० फेब्रुवारीपासून ५ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. वनडे सीरिजनंतर या दोघांमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज खेळवली जाईल.


भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २३ फेब्रुवारीपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये ५ वनडे मॅच होणार आहेत. या वनडे सीरिजमध्ये विजय मिळवूनही भारताला पहिल्या क्रमांकावर जायची संधी आहे. इंग्लंडमध्ये होणारा वर्ल्ड कप आधीची भारताची ही शेवटची सीरिज असेल. त्यामुळे या सीरिजमध्ये दणदणीत विजय मिळवून पहिल्या क्रमांकावर वर्ल्ड कपमध्ये जाण्याचा भारतीय टीमचा मानस असेल. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. 


अशी आहे सध्याची आयसीसी वनडे क्रमवारी