मुंबई : पाकिस्तानी नेमबाजांना नवी दिल्लीत होणाऱ्या रायफल शुटींग विश्वचषकासाठी व्हीसा नाकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं भारताशी संवाद बंद केलाय. नवी दिल्लीत होणारा विश्वचषक होणार असला तरी त्यातील २५ मीटर रॅपीड फायर इव्हेंटचा ऑलिम्पिक दर्जाही काढून घेतलाय. भविष्यात भारताला ऑलिम्पिकशी संबंधित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत असं ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलंय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामात १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ दलाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याविरोधात भारतीयांमध्ये प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. या भ्याड हल्ल्याविरोधात क्रीडा क्षेत्रातही तीव्र संताप पाहायला मिळाला. या घटनेनंतर पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही अशी मागणी जोर धरु लागली. 


त्यामुळे दिल्लीतील नेमबाजी विश्वचषकासाठी येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भविष्यात भारतात ऑलिम्पिक दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासंदर्भात बंदी घातली आहे. आयओसीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारताचे क्रीडा क्षेत्रातील नुकसान होणार आहे. 


दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचे संबंध पाकिस्तान सोबत ठेवायचे नाही. यानंतर पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना नेमबाजी वर्ल्ड कप मध्ये व्हिसा नाकारण्यात आला. भारताच्या या भुमिकेविरोधात  नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तान या संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे या सर्व प्रकारची तक्रार केली.


आयओसीने या सर्व संदर्भात एक पत्रक जाहीर केले आहे. या बाबतीत भारताच्या एनओसी, आयओसी तसेच आयएसएसएफने प्रयत्न केले.  या प्रयत्नानंतर देखील पाकिस्तानच्या या नेमबाजांना सहभागी करण्या संदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. ही भूमिका कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आयओसीच्या  निर्णयाविरोधात आहे. एखादी क्रीडा स्पर्धा किंवा ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद असलेला देश सहभागी देशांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय तसेच कोणत्याही भेदभावाशिवाय अनुकूल वातावरण तयार  करुन देण्यासाठी आयओए बांधिल आहे. असे या पत्रकातून सांगण्यात आले आहे.


जोपर्यंत भारतीय सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत भारतात कोणत्याही प्रकारचे क्रीडास्पर्धेचे आयोजन करणार नाही, असेही आयोसीने आपल्या पत्रकाद्वारे सांगितले आहे.