भारत-चीन वादाचा आयपीएलवर होऊ शकतो असा परिणाम
भारत-चीन यांच्यातील तणाव वाढता चालला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमेवरील वादाचा आता भारतीय क्रिकेटवरही परिणाम होऊ शकतो. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक वादात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. आता त्याचा परिणाम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) आणि टीम इंडियावरही दिसू शकतो.
विव्हो कंपनी
इंडियन प्रीमियर लीगचे शीर्षक प्रायोजक ही चिनी स्मार्टफोन कंपनी व्हिवो आहे. इतकेच नाही तर कंपनी स्पर्धेदरम्यान सर्वाधिक जाहिरात देखील करते. चिनी कंपनीने 2018 मध्ये पाच वर्षासाठी 2199 कोटी रुपयांचा करार केला होता. यंदा अजून आयपीएलचं आयोजन झालेलं नाही. पण भारतीयांच्या भावनेमुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) विव्हो बाबत काय निर्णय घेते हे पाहावं लागेल.
आयपीएल 29 मार्च रोजी सुरु होणार होती. परंतु कोरोनामुळे ती अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या आयोजनाबाबत शंका आहे. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी अनेक वेळा ते आयपीएलच्या आयोजनाबाबत सकारात्मक असल्याचं संकेत दिले आहेत.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शक्यता
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बोर्ड आयपीएल होईल का याबाबत विचार करत आहे. पण याबाबत काहीच सांगता येत नाही. दरम्यान आशिया कप आणि टी -२० विश्वचषक देखील आहे. पण यंदा विश्वचषक स्पर्धेचे यजमान ऑस्ट्रेलियाकडे आहे. ऑस्ट्रेलिया मात्र कोरोनामुळे अजून सकारात्मक नसल्याचं दिसतं आहे.