वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला आहे. न्यूझीलंडमध्ये एका वनडे सीरिजमध्ये ४ वनडे जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर आता या दोन्ही देशांमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. या तीन टी-२० मॅच ६ फेब्रुवारीला वेलिंग्टनमध्ये, ८ फेब्रुवारीला ऑकलंडमध्ये आणि १० फेब्रुवारीला हॅमिल्टनमध्ये होतील. न्यूझीलंडविरुद्धच्या या टी-२० सीरिजमध्ये भारताला पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लागोपाठ ११ टी-२० सीरिज जिंकण्याचं रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर होतं. पण नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या विश्वविक्रमाला ब्रेक लागला आहे.


भारतानं जुलै २०१७ सालानंतर एकही टी-२० सीरिज गमावली नाही. जुलै २०१७ साली वेस्टइंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला होता. यानंतर लागोपाठ १० टी-२० सीरिजमध्ये प्रतिस्पर्धी टीमला भारताला हरवता आलं नाही. यातल्या काही सीरिजमध्ये भारताचा विजय झाला, तर काही सीरिज अनिर्णित राहिल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर भारतानं दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आयर्लंड, वेस्टइंडिज या देशांविरुद्ध टी-२० सीरिज खेळली. या सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला नाही. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धची ही सीरिज जिंकून किंवा अनिर्णित ठेवून भारताला पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधता येईल.