मुंबई : 2019 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भविष्यवाणी केली आहे. सलग केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारत वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे, असं गांगुली म्हणाला आहे. 2003 आणि 2007मध्येही भारत वर्ल्ड कप जिंकेल, असं वाटत होतं. 2011 सालीही असंच वाटत होतं आणि हा विश्वास भारतीय टीमनं सार्थ ठरवला, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली आहे. स्वत:च्या आत्मचरित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमावेळी गांगुलीनं हे वक्तव्य केलं आहे. जगातली सर्वश्रेष्ठ टीम अशा गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. प्रत्येक टीम वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळं क्रिकेट खेळते. भारताकडे असलेली टीम ही मजबूत आहे, असं गांगुलीला वाटतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2003 सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. तर 2007 सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्याच फेरीमध्ये भारताला स्पर्धेमधून बाहेर पडावं लागलं होतं. 2011 साली मात्र धोनीच्या नेतृत्वात भारतानं वर्ल्ड कप जिंकला.


गांगुलीच्या आत्मचरित्र प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगही उपस्थित होते. या दोन्ही खेळाडूंनाही 2019 सालचा वर्ल्ड कप भारत जिंकेल, असं वाटतंय.


काय आहे गांगुलीच्या आत्मचरित्रात?


माझ्याबाबतीत देशातल्या लोकांना माहिती नाही असं काहीच नाही. त्यामुळे माझ्या या पुस्तकामुळे युवा खेळाडूंना मदत होईल, असं गांगुली म्हणाला. 'अ सेंच्युरी इज इनअफ' असं या पुस्तकाचं नाव आहे. फक्त रन बनवून कोणताच खेळाडू यशस्वी होत नाही. त्यांना कारकिर्दीमध्ये उतार-चढाव पाहावे लागतात. म्हणून मी पुस्तकाला हे नाव दिलं, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.


30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात


2019 सालचा क्रिकेट वर्ल्ड कप 30 मे ते 14 जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळवण्यात येईल. 5 जूनला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली मॅच खेळेल.


भारताच्या मॅचचं वेळापत्रक


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- साऊथॅम्पटन


९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- ओव्हल


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड- नॉटिंगहॅम


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान- मॅन्चेस्टर


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान- साऊथॅम्पटन


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- मॅन्चेस्टर


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड- बर्मिंगहॅम


२ जुलै- भारत विरुद्ध बांग्लादेश- बर्मिंगहॅम


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका- लीड्स


सेमी फायनल आणि फायनल


९ जुलै- पहिली सेमी फायनल


११ जुलै- दुसरी सेमी फायनल


१४ जुलै- फायनल