T20 World Cup: भारताकडे ऑस्ट्रेलियाला नॉक आउट करत वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी; कसं असेल नेमकं गणित ? समजून घ्या
T20 World Cup: सूपर 8 मधे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून नॉक आऊट करण्याची संधी आहे.
T20 World Cup: एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर खेळांडूसह अनेक भारतीयांच्या डोळयात अश्रू तरळले होते. तेव्हापासून भारतीय चाहते आपला संघ या पराभवाचा वचपा काढण्याची वाट पाहत आहेत. अखेर टी 20 वर्ल्डकपच्या निमित्ताने भारतीय संघाकडे ही संधी चालून आली आहे. 8 महिन्यानंतर दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. 24 जूनला सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम मधे हा सामना होणार आहे. दोन्ही संघाना सेमी फायनल गाठायची असल्याने हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे.
अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव
टी 20 वर्ल्डकप मधे आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. राशिद खानच्या नेतृत्वातील संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलिया विरोधातील हा पहिलाच विजय आहे. जर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केला असता तर भारत सेमी फायनलमधे दाखल झाला असता. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे सर्व गणित बिघडलं असून ग्रुप 1 मधील सर्व संघांसाठी सेमी फायनल गाठण्याची संधी निर्माण झाली आहे. दरम्यान भारताकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करत स्पर्धेतून बाहेर काढण्याची संधी आहे. यासह भारत वर्ल्डकप मधील पराभवाचा वचपाही काढू शकतो.
कसं असेल गणित
जर भारताने ऑस्ट्रेलियाचा आणि अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला तर ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतून बाद होईल. जर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध हरले आणि अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सुपर 8 सामना पावसामुळे रद्द झाला , तर राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीत पोहोचेल कारण त्यांचे 4 सामन्यांतून 3 गुण जमा होतील. जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर त्यांचे 6 गुण होतील आणि ते गट 2 मधे पहिल्या क्रमांकावर असतील. जर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले तरी सुपर 8 मध्ये त्यांची पात्रता निश्चित होणार नाही. कारण त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.