विराटच्या दीडशतकानंतर भारताचा धावांचा डोंगर
विराट कोहलीनं लगावलेल्या खणखणीत शतकामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
केप टाऊन : विराट कोहलीनं लगावलेल्या खणखणीत शतकामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ५० ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ३०३/६ एवढा झाला आहे. विराट कोहली १६० रन्सवर नाबाद राहिला. विराटच्या या खेळीमध्ये १२ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३४वं शतक आहे.
या मॅचमध्ये टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताला सुरुवातीलचा रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला. रोहित शर्मा शून्य रनवर आऊट झाला. यानंतर विराटनं शिखर धवनच्या मदतीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. शिखर धवन ६३ बॉल्समध्ये ७६ रन्स केले.
कोहली आणि शिखर धवनमधल्या पार्टनरशीपनंतर मात्र कोणत्याच भारतीय बॅट्समननं विराटला साथ दिली नाही. अजिंक्य रहाणे(११), हार्दिक पांड्या(१४), धोनी(१०) आणि केदार जाधव(१) लवकर आऊट झाले. विराटबरोबर भुवनेश्वर कुमार १६ रन्सवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून डुमनीनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर रबाडा, मॉरिस, पेहलुक्वायो आणि ताहिरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. ६ मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-०नं पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच ३ वनडे मॅच जिंकून आघाडी घ्यायची संधी भारताला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये कोणतेही बदल नाहीत. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी पहिले बॅटिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मात्र दुखापतीनं ग्रासलं आहे. एबी डिव्हिलियर्स, फॅप डुप्लेसीस आणि क्विटंन डीकॉक दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. फॅप डुप्लेसिसच्या अनुपस्थितीमध्ये एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे.