नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १२४-२ एवढा आहे. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या १६८ रनच्या आघाडीमुळे आता भारताची एकूण आघाडी २९२ रनवर पोहोचली आहे. दिवसाअखेर चेतेश्वर पुजारा ३३ रनवर आणि विराट कोहली ८ रनवर खेळत आहे. इंग्लंडच्या टीमला १६१ रनवर ऑल आऊट केल्यानंतर बॅटिंगला आलेले भारताचे ओपनर शिखर धवन आणि लोकेश राहुलनं भारताला चांगली सुरुवात करून दिली. ६० रनवर भारताची पहिली विकेट पडली. लोकेश राहुल ३३ बॉलमध्ये ३६ रन करून आऊट झाला. तर शिखर धवन ४४ रनवर आदिल रशिदच्या बॉलिंगवर स्टंम्पिंग झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडची टीम १६१ रनवर ऑल आऊट झाली. हार्दिक पंड्यानं ६ ओव्हरमध्ये २८ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जॉस बटलरनं ३२ बॉलमध्ये ३९ रनची जलद खेळी केली. हार्दिकच्या टेस्ट कारकिर्दीमधल्या या पहिल्या ५ विकेट आहेत.


ओपनर एलिस्टर कूक आणि किटन जेनिंग्सनं इंग्लंडला ५४ रनची सुरुवात करून दिली. पण यानंतर इंग्लंडची पडझड सुरूच झाली. स्कोअरबोर्डवर १२८ रन असताना इंग्लंडचा नववा बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये गेला. पण जॉस बटलरनं जलद रन करून इंग्लंडला १६१ रनपर्यंत पोहोचवलं.


तत्पूर्वी तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॉलरनी सुरुवातीलाच भारताला धक्के दिले. यामुळे भारताचा ३२९ रनवर ऑल आऊट झाला आहे. भारतानं दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ३०७/६ अशी केली होती. पण ब्रॉडनं २ आणि अंडरसननं २ विकेट घेत भारताची इनिंग संपवली.