भारताचा सगळ्यात मोठा पराभव, ८० रननी पहिली टी-२० गमावली
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी दारुण पराभव झाला आहे.
वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी दारुण पराभव झाला आहे. रनच्या हिशोबानं भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. न्यूझीलंडनं ठेवलेल्या २२० रनचा पाठलाग करताना भारतीय टीमला फक्त १३९ रन बनवता आल्या. या मॅचमध्ये भारताला २० ओव्हरही बॅटिंग करता आली नाही. १९.२ ओव्हरमध्ये भारताचा ऑलआऊट झाला.
भारताकडून धोनीनं सर्वाधिक ३९ रन केल्या. तर शिखर धवननं १८ बॉलमध्ये २९ आणि विजय शंकरनं १८ बॉलमध्ये २७ रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला कर्णधार रोहित शर्माच्या रुपात लवकरच पहिला धक्का लागला. रोहित शर्मा १ रन करून आऊट झाला. या मॅचमध्ये भारतानं विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं. विजय शंकरनं सुरुवातीला फटकेबाजी केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊदीला सर्वाधिक ३ विकेट मिळाल्या. तर लॉकी फरग्युसन, मिचेल सॅण्टनर आणि ईश सोदीला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. डॅरिल मिचेलला १ विकेट मिळाली.
या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलरना न्यूझीलंडला धक्के देण्यात यश आलं नाही. २० ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं ६ विकेट गमावून २१९ रन केल्या.
न्यूझीलंडच्या टीम सायफर्टनं ४३ बॉलमध्ये ८४ रनची विस्फोटक खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. कॉलीन मुन्रोनं २० बॉलमध्ये ३४ आणि कर्णधार केन विलियमसननं २२ बॉलमध्ये ३४ रनची खेळी केली.
भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, कृणाल पांड्या आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. भारताच्या प्रत्येक बॉलरनं त्याच्या निर्धारित ४ ओव्हरमध्ये खोऱ्यानं रन दिल्या, त्यामुळे न्यूझीलंडला एवढ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
भारताची न्यूझीलंडमधली टी-२०तली कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारताला आत्तापर्यंत न्यूझीलंडच्या जमिनीवर एकही टी-२० मॅच जिंकता आली नाही.