लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. पहिल्या टेस्ट प्रमाणेच दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही भारतीय बॅट्समननी निराशा केली आहे. लॉर्ड्सच्या मैदानामध्ये भारताचा एक इनिंग आणि १५९ रननी दारुण पराभव झाला आहे. याचबरोबर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. पावसामुळे पहिल्या दिवशी एकही बॉल टाकला गेला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं टॉस जिंकून पहिले भारताला बॅटिंगला बोलावलं. दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण आणि पावसाचा फायदा घेत इंग्लंडनं १०७ रनवर भारताला ऑल आऊट केलं. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसननं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडनं  ३९६ रनवर डाव घोषित केला. यामुळे त्यांना २८९ रनची आघाडी मिळाली. क्रिस वोक्स १३७ तर जॉनी बेअरस्टोनं ९३ रन केले. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला सॅम कुरन ४० रनवर आऊट झाला. यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं डाव घोषित केला. भारताकडून मोहम्मद शमीनं ३, हार्दिक पांड्यानं ३ आणि इशांत शर्मानं १ विकेट घेतली.


इंग्लंडनं डाव घोषित केल्यानंतर इनिंगनं पराभव टाळण्याचं आव्हान भारतीय टीमपुढे होतं. पण पहिल्या इनिंगप्रमाणेच दुसऱ्या इनिंगमध्येही मुरली विजय शून्यवर आऊट झाला आणि भारताला एकामागोमाग एक धक्के बसतच राहिले. अखेर १३० रनवर भारतीय टीम ऑल आऊट झाली. पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेणाऱ्या जेम्स अंडरसनला दुसऱ्या इनिंगमध्ये ४ विकेट मिळाल्या. तसंच स्टुअर्ट ब्रॉडनं ४ आणि क्रिस वोक्सनं २ विकेट घेतल्या. रवीचंद्रन अश्विन या मॅचमधला भारताचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू ठरला. अश्विननं पहिल्या इनिंगमध्ये २९ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद ३३ रन केल्या.