इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत एक विकेट दूर
इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत फक्त एका विकेटनं दूर आहे.
नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत फक्त एका विकेटनं दूर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं ९ विकेट गमावून ३११ रन केले आहेत. भारतानं इंग्लंडपुढे तिसऱ्या दिवशी ५२१ रनचं तगडं आव्हान ठेवलं. यानंतर इंग्लंडनं चौथ्या दिवसाची सुरुवात २३-० अशी केली. पण ईशांत शर्मानं सुरुवातीलाच इंग्लंडला दोन धक्के दिले. एकेवेळी इंग्लंडची अवस्था ६२-४ अशी झाली होती. पण जॉस बटलर आणि बेन स्टोक्सच्या पार्टनरशीपमुळे इंग्लंडला सावरलं.
जॉस बटलरनं १०६ रनची तर बेन स्टोक्सनं ६२ रनची खेळी केली. या दोघांची विकेट पडल्यानंतर भारतानं लागोपाठ इंग्लंडला झटके दिले. जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट तर ईशांत शर्मानं २ आणि मोहम्मद शमी, हार्दिक पांड्याला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत ०-२नं पिछाडीवर आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून सीरिजमधलं आव्हान कायम ठेवणं भारताला गरजेचं आहे.