नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला. यामुळे भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमधला भारताचा हा ५००वा विजय होता. वनडेमध्ये ५०० विजय मिळवणारा भारत हा दुसरा देश बनला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत ९२४ मॅचमध्ये ५५८ विजय मिळवले आहेत, तर ३२३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. या यादीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं ९६३ मॅचमध्ये ५०० विजय मिळवले तर ४१४ मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.


भारताचे सर्वाधिक पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे भारताचा ५०० वा विजय झाला असला तरी वनडे क्रिकेटमधले सर्वाधिक पराभव भारताच्या नावावर आहेत. एकूण ९६३ मॅचपैकी भारताचा ४१४ मॅचमध्ये पराभव झाला आहे. भारतानंतर श्रीलंकेचा ४११ मॅचमध्ये पराभव झाला आहे. सर्वाधिक पराभवाच्या यादीमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्ताननं आत्तापर्यंत ४०१ मॅच गमावल्या आहेत. भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान सोडलं तर इतर कोणत्याच टीमचा ४०० मॅचमध्ये पराभव झाला नाही. 


वनडेमधलं विजय-पराभवाचं रेकॉर्ड


टीम मॅच विजय पराभव
ऑस्ट्रेलिया ९२४ ५५८ ३२३
भारत ९६३ ५०० ४१४
पाकिस्तान ९०७ ४७९ ४०१
वेस्ट इंडिज ७९३ ३९० ३६५
श्रीलंका ८३२ ३७९ ४११
दक्षिण आफ्रिका ६०६ ३७४ २१०
इंग्लंड ७२६ ३६२ ३३०
न्यूझीलंड ७५८ ३४२ ३७०
झिम्बाब्वे ५१७ १३४ ३६५
बांगलादेश ३५८ ११८ २३३

वेस्ट इंडिजचे सर्वाधिक टाय सामने


वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक टाय सामने वेस्ट इंडिजच्या नावावर आहेत. वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या १० मॅच टाय झाल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत-ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी ९-९ मॅच टाय झाल्या आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंडच्या ८-८, न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेच्या ६-६ मॅच टाय झाल्या. झिम्बाब्वेनं ७ टाय मॅच खेळल्या. भारत आणि न्यूझीलंडच्या सर्वाधिक ४० मॅच या पाऊस आणि इतर कारणांमुळे रद्द झाल्या.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली वनडे ५ जानेवारी १९७१ ला खेळवली गेली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ही मॅच झाली होती. भारतानं पहिली वनडे १९७४ साली खेळली. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय टीम टॉप-५ मध्येही नव्हती. उलट पाकिस्तानच्या टीमला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळत होता.


१९७५ साली खेळल्या गेलेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये भारताला फक्त १ मॅच जिंकता आली होती. त्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं इस्ट आफ्रिकेचा पराभव केला होता. यानंतप इस्ट आफ्रिकेची टीम एकदाही वर्ल्ड कप खेळली नाही. यानंतर १९७९ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. १९८३ साली मात्र कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं इतिहास घडवत वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय टीमचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं महत्त्व वाढलं.