टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत खेळणार; बीसीसीआयकडून अधिकृत दुजोरा
भारतीय संघाच्या जर्सीवरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई: विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ भगव्या रंगाची नवी जर्सी घालून मैदानात कधी उतरणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शुक्रवारी अधिकृत ट्विटर हँडलवरून या जर्सीचा फोटो ट्विट करण्यात आला. भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ही जर्सी घालून खेळेल.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाच्या या नव्या जर्सीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. अनेकजण टीम इंडिया नव्या जर्सीत कधी दिसणार, असा प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, बीसीसीआयकडून यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही अफवा असल्याचेही सांगितले जात होते. परंतु, अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वचषक स्पर्धेपूर्वीच इंग्लंड वगळता सर्व संघांना जर्सीचे दोन रंग ठेवण्यास सांगितले होते. आयसीसीने Home आणि Away ही संकल्पना राबवली होती. त्यानुसार एकाच रंगाची जर्सी घालून खेळणाऱ्या संघाना Home आणि Away सामन्यांकरता वेगवेगळ्या जर्सी घालणं बंधनकारक होते. टीम इंडियाने भगवा रंग निवडल्याची चर्चा होती. यावरून वादंगही निर्माण झाला होता. या जर्सीचा समोरचा भाग निळाच ठेवण्यात आला असून हात आणि पाठीकडचा संपूर्ण भाग केशरी रंगाचा आहे.